मनोर, ता. ३० (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात नोंदणी पद्धतीच्या विवाहांच्या संख्येत वाढ होत आहे. २०१८ पासून जिल्हा मुख्यालयाच्या आवारातील दुय्यम निबंधक कार्यालयात दोन हजार ५०६ विवाहांची नोंदणी विशेष विवाह कायद्यानुसार झाली. आतापर्यंत एकूण दोन हजार ८१६ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले आहेत. यामध्ये घटस्फोटितांच्या विवाहांचाही समावेश असून त्याचे प्रमाण अन्य विवाहांच्या तुलनेने जास्त आहे. फॉर्म १६ च्या आधारे ३११ विवाह झाले आहेत.
दहा वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊनही नोंदणी विवाहांसाठी संबंधित विभागाचे कार्यालय नव्हते. २०१८ मध्ये कार्यालयाची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी पालघर जिल्ह्यातील विवाह इच्छुकांना ठाणे अथवा वांद्रे येथील न्यायालयात जावे लागत असे. ठाण्याला पोहोचणे जिकिरीचे होत असल्याने रेल्वेमार्गे मुंबईत जाणे पसंत करत असत.
पालघर जिल्हा मुख्यालयातील प्रशासकीय ब इमारतीमधील उपनिबंधक कार्यालयात नोंदणी पद्धतीचे विवाह पार पडत आहेत. दिवसागणिक नोंदणी पद्धतीच्या विवाहांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षी नोंदणी पद्धतीने सर्वाधिक ६५९ विवाह पार पडले. यात विशेष विवाहांची संख्या ५५१, तर पारंपरिक पद्धतीच्या विवाहांची संख्या १०८ होती.
वैदिक अथवा पारंपरिक पद्धतीच्या विवाहाची नोंदणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम १९९८ कायदा अस्तित्वात आहे. विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत विवाह पार पडण्याकरिता या कायद्यातील कलम चारमध्ये अटींच्या पूर्ततेनंतर कलम पाच अन्वये विशेष विवाह पार पाडता येतो. तसेच अन्य पद्धतीने झालेल्या विवाहांची नोंदणी विशेष विवाह कायद्यातील कलम १५ मधील तरतुदीची पूर्तता केल्यावर कलम १६ प्रमाणे करण्यात येते.
विशेष विवाह कायद्यांतर्गतचा विवाह कार्यालयाव्यतिरिक्त घरासह अन्य ठिकाणी करण्याची तरतूद आहे. वैदिक/धार्मिक पद्धतीने पार पडलेल्या विवाहांची नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते. विवाहाची नोंदणी न केल्यास विवाह बेकायदा ठरत नाही. नोंदणीअभावी विवाहाचा शासकीय पुरावा संबंधित जोडप्यांकडे उपलब्ध राहत नाही. त्यामुळे शासकीय अभिलेखात विवाह झाल्याची नोंद घेण्यास अडचणी येतात. महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियमाची राज्यात अंमलबजावणी करण्याचे अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागासही आहेत.
स्वतंत्र कार्यालयाचा अभाव
दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी केली जाते. विशेष विवाह केलेल्या जोडप्यांना प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी वेगळी व्यवस्था नसल्याने जमीन, घर आणि अन्य खरेदी-विक्रीच्या नोंदणीसाठी येणाऱ्यांची उपनिबंधक कार्यालयात मोठी गर्दी होते. त्यामुळे नोंदणी पद्धतीने लग्न करणारी जोडपी आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाइकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात सेल्फी पॉईंट
विवाह नोंदणी झाल्यानंतर जोडप्यांना एकमेकांचे स्वागत करण्यासाठी स्वतंत्र सभागृह नसल्याने गैरसोय होते. एक सेल्फी पॉईंटसह वधू-वरासाठी छोटासा रंगमंच आणि बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करणार असल्याची माहिती जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.
पालघरमधील विवाहांची आकडेवारी
वर्ष विशेष फॉर्म १६ एकूण
२०१८ १४९ ९ १५८
२०१९ ३२५ १८ ३४३
२०२० २९६ १६ ३१२
२०२१ ४९५ ४१ ५३५
२०२२ ५२४ ९७ ६२१
२०२३ ५५१ १०८ ६५९
२०२४ (२२ मार्चपर्यंत) १६६ २२ १८८
एकूण २,५०५ ३११ २,८१६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.