संदीप साळवे : सकाळ वृत्तसेवा
जव्हार, ता. २१ : तालुक्यात ४८ ग्रामपंचायत आणि दोन ग्रामदान मंडळ आहेत. तालुक्याची संख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालये, बँका, दवाखाना, पोलिस ठाणे, न्यायालय जव्हार शहरात आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक विविध कामांसाठी शहरात येत असतात. अशा वेळी वस्तू खरेदी करण्यापासून ते कोणताही व्यवहार करण्यापर्यंत दहा रुपयांची नाणी तथा नोटांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेकदा सुटे पैशांअभावी गैरसोय होत आहे.
बऱ्याचदा किरकोळ खरेदीसाठी ऑनलाईन पेमेंटचे माध्यम वापरले जाते; परंतु प्रवास करताना किंवा फिरत असताना अचानक मोबाईलचे नेटवर्क गेल्यास गैरसोय होऊन नाहक त्रास सहन करावा लागतो. येथे बाजारपेठेतील व्यापारी दुकानात शक्यतो सुटे पैसे ठेवतात; परंतु सध्या बँकेतून दहा रुपयांच्या चलनाची ऐन उन्हाळी हंगामातच सर्वत्र कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याची स्थिती आहे. अनेक मोठ्या व्यापाऱ्यांना दहा रुपयांच्या चलनासाठी बाहेरगावी एक हजार रुपयांना १० रुपये कमिशनचा भुर्दंड सोसावा लागतो; परंतु सध्या तेदेखील मिळत नसल्याने व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. दहा रुपयांच्या चलनाच्या तुटवड्यामुळे व्यापारी व ग्राहक त्रस्त झाले आहेत. पूर्वीपासून येथे चलनातून दहा रुपयांच्या नोटा गायब होत्या; परंतु आता तर दहा रुपयांची नाणीही मिळत नसल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच कृत्रिम तुटवड्याचा शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी व्यापारी करत आहेत.
ऑनलाईन माध्यमाला प्रोत्साहन देण्यासाठी काही प्रमाणात तरी इंटरनेट सुविधा आणि विजेची समस्या सुरळीत व मजबूत करण्याची आवश्यकता आहे. सोयी असूनही डिजिटल व्यवहार वापरण्यास अडथळे निर्माण होत आहेत. निवडणुकीमुळे सुटे पैसे पुरवण्यासाठी सरकारकडे पुरेशी सुरक्षेची व्यवस्था नसल्याचे जुजबी कारण प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे बँकेतील कर्मचाऱ्यांना सुट्या पैशांअभावी ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामीण भागातून जव्हार शहरात येणारा कोणताही नागरिक हा काही कामांसाठी येत असतो. बाजारहाट, दवाखाना, सरकारी कामे, कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर सुटे पैसे विचारले जातात. बऱ्याचदा सुटे पैसे नसतात आणि मोबाईल नसल्याने ऑनलाईन पैसेही देता येत नाहीत. त्यामुळे बँकेतून सुटे पैसे व्यवस्था व्हायला पाहिजे.
- संदेश भोये, पेरण आंबा
तालुक्यातील बाजारपेठ जव्हार शहरात असल्याने ग्रामीण भागातून अनेक नागरिक येत असतात. वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांना सुटे पैसे परत देण्यासाठी मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे बँक प्रशासनाने व्यापाऱ्यांना आवश्यक सुट्टे पैसे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- सगिर कोतवाल, व्यापारी
जव्हार एसबीआय शाखेला वर्षातून एकदाच दहा रुपयांची नाणी अथवा नोटा देण्यात येतात. त्यानंतर आरबीआयकडे मागणी केल्यानंतर उपलब्धतेनुसार १० रुपये व्यापाऱ्यांना दिले जातात. सध्या २० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. ही सगळी व्यवस्था रोख रकमेचे अधिकारी पाहतात.
- गणेश बोधक, व्यवस्थापक, एसबीआय, जव्हार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.