शिवडी, ता. २१ (बातमीदार) : प्रतिभावंत स्व. शाहीर आत्माराम पाटील यांच्या सुरेल रचना रसिकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचविणारे शाहीर सिकंदर शेख, शाहीर मधू मोरे, शाहीर कृष्णकांत जाधव यांच्यानंतर शाहीर सुखदेव कांबळे हे एक संस्मरणीय शाहीर होते. अडीअडचणीतील सहकलाकारांना मदतीचा हात देणारे शाहीर सुखदेव कांबळे कायम रसिकांच्या हृदयात राहतील, अशी भावपूर्ण शब्दांत नाटककार ज्ञानेश महाराव यांनी दिवंगत शाहीर सुखदेव कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली.
जुन्या काळातील एक लोकप्रिय शाहीर सुखदेव कांबळे यांचे गेल्याच आठवड्यात आकस्मिक निधन झाले. त्यांच्या कलाजीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी कांबळे कुटुंबीय आणि शाहिरी लोक कलावंत मंचच्या वतीने गं. द. आंबेकर मार्गावरील ‘लॅंडमार्क टॉवर’मधील मिनी थिएटरमध्ये सोमवार (ता. २०) श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सुखदेव कांबळे यांच्या स्मृतींना उजाळा देताना ज्ञानेश महाराव म्हणाले, शाहीर सुखदेव कांबळे यांनी आपल्या चमकदार व्यक्ती महत्त्वातून गाण्यात चैतन्य निर्माण केले. लोककलेचे विपुल तपशील गाठीशी बाळगणाऱ्या शाहीर सुखदेव कांबळे यांनी अपार कष्टातून लोककला जोपासली. जगण्याची आस असणारे सुखदेव आकस्मिक आपल्यातून निघून गेले, याची खंत सर्वांना वाटत राहणार आहे, असे ज्ञानेश महाराव श्रद्धांजली वाहताना म्हणाले.
शाहीर सुखदेव कांबळे यांच्या कन्या पार्श्वगायिका डॉ. शिल्पा मालंडकर आणि पुत्र पुरुषोत्तम कांबळे यांनी प्रारंभी पित्याच्या कलाजीवनातील अभूतपूर्व आठवणींना उजाळा दिला. यापुढे त्यांची जयंती लोककलेतील गरीब कलावंताच्या मदतीने संपन्न होईल, असा संकल्प कांबळे कुटुंबीयांच्या वतीने जाहीर करण्यात आला.
शाहीर मधू खामकर म्हणाले, शाहिरी लोक कला पुनर्स्थापित करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. संगीतकार मनोहर गोलांबरे आणि प्रशांत ठाकरे म्हणाले, थोर कलाकाराची कलेतील थोरवी कायम स्मरणात राहण्यासाठी ‘डॉक्युमेंटेशन’ स्वरूपात त्यांची कला जोपासावी लागेल.
….
लोककलेच्या अभ्यासकांसाठी ‘ज्ञानपीठ’
कथालेखक आणि शाहिरी लोककला मंचचे समन्वयक काशिनाथ माटल म्हणाले, शाहीर सुखदेव कांबळे लोककलेच्या अनेक अभ्यासकांसाठी ते ‘ज्ञानपीठ’ होते. तसेच शहरापासून खेड्यापाड्यातील कलावंताना आज वाढीव मानधन मिळणार आहे, या पाठिमागे शाहीर सुखदेव कांबळे यांचे प्रयत्न मोलाचे ठरले आहेत, असे खंडू गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.