भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात या वर्षी मतदान मागील निवडणुकीच्या तुलनेत चार टक्क्यांनी घसरले आहे. यावर्षी एकूण मतदानाची टक्केवारी सुमारे ४५.२५ टक्के झाली. गेल्या वेळी म्हणजेच २०१९ मध्ये ही आकडेवारी ४९.१ टक्के होती. अनेक मतदार गावी गेले असल्याने मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने याआधीच प्रकाशित केले होते.
मिरा-भाईंदर शहरात उत्तर भारतीय, जैन, गुजराती व राजस्थानी मतदारांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. दरवर्षी यातील बहुतांश लोक मेच्या सुटीनिमित्त गावी जातात. चाकरमानी, तसेच व्यावसायिक कामानिमित्त लवकर परतत असले तरी त्यांचे कुटुंब सुमारे महिनाभर गावीच असते. त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीसाठी २९ एप्रिलला मतदान झाले होते. अनेक लोक गावी गेले नव्हते; मात्र तरीही त्या वेळी मतदानाची टक्केवारी ४९.१ एवढीच राहिली होती.
शहरातील अनेक उत्तर भारतीय मतदार एप्रिलअखेर गावी निघून गेले होते. त्या काळात लग्नाचे मुहूर्तदेखील अनेक होते. त्यामुळे लग्नसमारंभ आटोपून लोक मतदानासाठी परत येतील, अशी अपेक्षा उमेदवारांना वाटत होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरली. मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या चार लाख ३९ हजार २८३ आहे. त्यातील सुमारे एक लाख ९८ हजार ७७६ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला आहे. गावी गेलेले मतदार, उन्हाची काहिली, निवडणूक आयोग व राजकीय पक्षांकडून मतदारांना व्होटर स्लीप न मिळणे, मतदारांमध्ये मतदानाबाबत असलेला निरुत्साह यासोबतच मतदार याद्यांमधील गोंधळामुळे मतदारांची नावे न सापडणे, शेकडो मतदारांची नावे डिलीट होणे या सर्वांचा परिणाम म्हणून मतदानात तब्बल चार टक्के घसरण झालेली पहायला मिळाली.
शेवटच्या एक तासात अवघे दोन टक्के मतदान
वास्तविक सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४३.२५ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या एक तासात राजकीय पक्ष जास्तीत जास्त मतदार बाहेर काढतात. त्यामुळे सहा वाजेपर्यंत शेवटच्या एक तासात आणखी किमान सहा ते सात टक्के मतदान होईल व किमान गेल्यावेळची मतदानाची टक्केवारी गाठली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होती. परंतु शेवटच्या एक तासात अवघे दोन टक्के मतदानच झाले. अनेक मतदान केंद्र दुपारी साडेचार वाजल्यानंतर ओस पडल्याचे चित्र दिसून येत होते. या घसरलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका कोणाला होतो, हे आता ४ जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.