भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला आहे. यामुळे दुपारी अंगाची अक्षरश: लाही लाही होत आहे. अशा स्थितीत प्रवासी आणि तहानलेल्या नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी भिवंडीमधील कांबे गावातील एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षात दोन ड्रम भरून पिण्याचे पाणी प्रवाशांना पिण्यासाठी ठेवले आहे. यासाठी त्यांना प्रत्येक महिन्याला पाचशे ते सहाशे रुपये इतका खर्च येत आहे.
सुनील नरहरी चौहान (५४) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. ते भिवंडीतील कांबे गावात राहतात. मागील २२ वर्षांपासून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी दुपारी ते आपली रिक्षा घेऊन भिवंडी रोड रेल्वे स्थानकाजवळ आले. यावेळी प्रवासी थांब्यावर उभे होते; मात्र पिण्याच्या पाण्याची येथे सुविधा नसल्याने येथे रस्त्यावर उष्णतेमुळे एक रिक्षाचालक बेशुद्ध पडल्याचे दिसला. तर तापमानाचा पारा वाढल्याने रेल्वे स्थानकाबाहेर तिघेजण चक्कर येऊन खाली पडले. हे पाहून सुनील यांनी स्वत: भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते महावीर चौकापर्यंत पाण्याचा शोध घेतला; मात्र त्यांना ग्लासभर पाणी उपलब्ध झाले नाही. यामुळे सुनील व्यथित झाले अन् उन्हाळ्यापर्यंत गरजूंना मोफत पाणी देण्याची शपथ घेतली.
सुनील यांनी रिक्षात वीस लिटर पाण्याचे दोन डबे बांधले आणि रखरखत्या उन्हात नागरिकांची तहान भागवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ते आपल्या ऑटोरिक्षात थंड फिल्टर केलेल्या पाण्याचे दोन ड्रम घेऊन गरजूंना मोफत पाणी देत आहेत. ‘वॉटर इज लाइफ’ हा उपक्रम राबविणाऱ्या रिक्षाचालकाच्या या उपक्रमाचे लोकांकडून कौतुक होत आहे. एका ऑटोरिक्षाचालकाने रस्त्यावरील नागरिकांना मोफत पाणी देण्याचे काम सुरू केल्याने प्रवासी नागरिकांनीदेखील त्यांचे आभार मानले.
दररोज १०० ते २२० रुपये खर्च
लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यानंतर त्यांना आढळून आले की पादचारी व प्रवाशांना या उन्हामुळे दररोज ८० लिटर थंड पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सुनील दररोज ८० लिटर फिल्टर केलेले थंड पाणी विकत घेतात आणि लोकांना ते मोफत देतो. यासाठी तो दररोज १०० ते २२० रुपये खर्च करत आहेत. पैशाची चिंता न करता, पाऊस येईपर्यंत जनतेला जाता जाता मोफत पाणी देणार असल्याचे सुनील यांनी सांगितले. शहरात कडक ऊन असूनही शहरात कुठेही पाणपोईची व्यवस्था नाही. समाजसेवकांनीदेखील याकडे लक्ष न दिल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.