मुंबई, ता. २८ : कोस्टल रोडच्या बोगद्यात लागलेल्या गळतीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची मंगळवारी (ता.२९) पाहणी केली. या गळतीमुळे कोस्टल रोडला कोणताही धोका नाही. जोडकामाच्या सांध्यांमध्ये गळती झाल्याचे समोर आले आहे. मात्र या पॉलिमर ग्राऊटिंग इंजेक्शन दिल्यामुळे दोन्ही ठिकाणची गळती आणि तीन ठिकाणी झिरपणारे पाणी बंद झाले आहे.
कोस्टल रोडच्या बोगद्यांमधील गळती रोखण्यासाठी जॉइंटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ‘ग्राऊंटिंग इंजेक्शन’ देण्यात येणार आहे. यामुळे कोस्टल रोडचे बोगदे ‘वॉटरप्रुफ’ होतील. गरज पडल्यास नव्या तंत्रज्ञानाने डागडुजी करून कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मुंबई महापालिकेचा महत्वांकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोडचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राइव्ह असा एक मार्गाचा टप्पा ११ मार्च रोजी वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे. ही लेन सुरु झाल्यानंतर दोन महिन्यांतच या मार्गावरील बोगद्याला गळती लागल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पालिकेने तत्काळ गळती रोखण्याचे काम सुरु केले असून लवकरच कायम स्वरुपी गळती दूर केली जाणार आहे.
दरम्यान कोस्टल रोड वरळी येथे ४.५ किमीच्या वांद्रे वरळी सी-लिंकला महाकाय दोन गर्डंरनी जोडण्यात आला आहे. कोस्टल रोडचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. यामुळे मरीन ड्राइव्ह ते थेट वांद्रे असा पाऊण तासाचा प्रवास अवघ्या बारा मिनिटांत करता येणार आहे. उर्वरित काम काही दिवसांत काम पूर्ण झाल्यानंतर १० जून रोजी कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
‘मविआ’चे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णपणे तयार होऊन नागरिकांसाठी खुला झाला असता. पण, भ्रष्ट राजवटीने आमचे सरकार पाडल्यानंतर या प्रक्लपाच्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचे काम केले. फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा उद्घाटनाच्या तारखा बदलत राहिल्या, त्यावेळेस मी ते निदर्शनासही आणले होते, आणि तेही फक्त एका लेनसाठी सुरू होते. शेवटी आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत १ लेन सुरू करण्यात आली असा टोला शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.