उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा!
तानाजी मालुसरेंची गाथा, महिलांच्या सुरक्षेसह सन्मानावर देखावा
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : ‘बोल बजरंग बली की जय’ असे म्हणत गेले दोन महिने प्रत्येक गोविंदा पथक दहीहंडीचा सराव करत होते. यावर्षी अनेक दहीहंडी पथकांनी समाजोपयोगी पथनाट्य सादर करून सध्याचा सर्वात जळजळीत आणि महिलांवर होणाऱ्या बलात्कार या महत्त्वाच्या विषयावर पथनाट्य सादर केले. दादर येथील आयडीयलच्या गल्लीत दिवसभरात ६० हून अधिक गोविंदा पुरुष आणि महिला पथक सहभागी झाले होते. या वेळी सर्वाधिक बोलबाला होता तो मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाचा. या पथकाने गेल्या दोन वर्षांपासून समाजात घडणाऱ्या वाईट वृत्तीवर आपल्या मानवी मनोऱ्यातून भाष्य करण्यास सुरुवात केली आहे.
शिवसागर मित्र मंडळाने यावर्षी मानवी मनोरे रचून तानाजी मालुसरे यांची जीवनकथा मांडली, तर दुसऱ्या देखाव्यात महिलांनीच छत्रपती शिवाजी महाराज बनून स्वतःचे रक्षण करावे लागेल, असे आवाहन केले गेले. दरवर्षीप्रमाणे श्री साई दत्त मित्र मंडळाने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यंदा या मंडळाचे ५० वे वर्ष असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरे रचण्यात गोविंदा पथकाला यश आले आहे. या गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी कलाकारही उपस्थित होते. लिटिल चॅम्प्समधील गायक रोहित राऊत, आशीष कुलकर्णी, शार्मली सुखटणकर, देवेंद्र कदम, कल्याणी खिमे, संपदा कदम, सुहास खामकर, हे उपस्थित होते.
महिला मंडळाने फोडली हंंडी
प्रभादेवीचे प्रगती मंडळ या महिला पथकाने पाच थर लावून गल्लीतील हंडी फोडली, तसेच जॉली या विलेपार्लेतील महिला दहीहंडी पथक मंडळाकडून दाणपट्टा व तलवारबाजी याची प्रात्यक्षिके सादर केली गेली.
सायबर क्राईमला आळा
पाटकर वर्दे काॅलेज मुलींनी अनोखा प्रयोग करत वाढलेल्या सायबर क्राईमवर वाच्यता करण्यासाठी नृत्य केले. पोलिस बाप्पाने क्राईमपासून कशा प्रकारे बचाव होऊ शकतो, याचे महत्त्व पटवून दिले. मोठ्या आवाजाचे डीजे न लावता पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी केली पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सहकाऱ्यांनी पथनाट्यातून केले. कला संजीवन या दृष्टिहीन गोविंदा पथकाने तीन थर रचून हंडीला सलामी दिली.
मंगळागौरचे सादरीकरण
‘कल्पना’ या ग्रुपने यंदा पहिल्यांदाच दहीहंडीच्या चित्तथरारक स्पर्धेत आपली मंगळागौर सादर केली. या ग्रुपचे हे दुसरे वर्ष आहे. मंगळागौर आणि लेझीम या दोन खेळांसाठी त्यांनी अनेक बक्षिसे जिंकल्याचे ग्रुपप्रमुख कल्पना राणे यांनी सांगितले.
स्त्री सन्मान, समाजाचा अभिमान
आंतरराष्ट्रीय जपान कराटे असोसिएशन इंडियाने महिलांना स्वतःचे रक्षण स्वतःच करण्याचे आवाहन आपल्या कराटेच्या प्रात्यक्षिकांमधून केले, तर नुकत्याच झालेल्या डाॅक्टरवरील बलात्कारावर भाष्य करत स्वरक्षणाचे धडे दिले. याचसोबत नयन आणि आधारिका फाउंडेशनच्या अंध मुला-मुलींनी तीन थर रचून महिलांच्या सुरक्षेचा संदेश दिला, तर मुलांनी वर्ल्डकप जिंकलेल्या भारतीय टीमचे स्वागत केले.
सेलिब्रिटी दहीहंडी
दादरच्या आयडीयल गल्लीत अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेऊन गोविंदांचा उत्साह द्विगुणीत केला. ‘मन धागा धागा जोडतो मना’ या मालिकेतील मुख्य कलाकार मयुरी देशमुख आणि अभिषेक रहाळकर यांनी दहीहंडी फोडून त्यांच्या उत्साहात सहभाग घेतला, तसेच उपस्थित फॅन्ससोबत सेल्फिदेखील काढली. दरम्यान, दुर्गा या नवीन मालिकेमधील ‘दुर्गा’ म्हणजेच रुपाली खरे हिने मंगळागौरमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. दरम्यान, दिवसभरात थरावर थर रचून गोविंदांनी दादर परिसर दणाणून सोडला होता. येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाचे स्वागत तालासुरात करण्यासाठी डिजे, ढोल-ताशे यांचे नियोजन करण्यात आले होते. या गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईकरांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.