वांद्र्यातील बांधकाम व्यावसायिकाची
६३ कोटींची फसवणूक
अंधेरी, ता. ३० बातमीदार ः बनावट ठराव आणि कागदपत्रे तयार करून एका कंपनीच्या संचालकांनी वांद्र्यातील बांधकाम व्यावसायिकाची ६३ कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सेठिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीसह कंपनीचे संचालक बसंतराज सेठिया (५८) तत्कालीन संचालक अक्षय कोठारी (६०) आणि रितेश ओम्बाळकर (४३) यांच्याविरोधात खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
वांद्रे, निर्मलनगरमधील रहिवासी बांधकाम व्यावसायिक वामन माडये (६२) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा राजहंस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स नावाने २० वर्षांपासून बांधकाम व्यवसाय आहे. माडये यांनी भागीदारीमध्ये स्वराज असोसिएट नावाने एक फर्म स्थापन करून निर्मलनगरमधील तीन मालमत्ता खरेदी आणि विकास करारनाम्याव्दारे मिळवल्या होत्या, तसेच तीन मालमत्ता माडये यांनी वैयक्तिक खरेदी आणि विकास करारनाम्याव्दारे मिळवल्या. यातील चार मालमत्तांवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवून त्यांचा विकास करण्यात येणार होता.
निर्मलनगर गौशा सहकारी गृहनिर्माण संस्था, वांद्रे (पूर्व) येथील तीन प्लॉटचे एकत्रित क्षेत्रफळ असलेली ६४० चौरस मीटरची मोकळी जागा असून तेथे पत्रा मारलेला आहे. त्यावर बसंतराज सेठिया याने अनधिकृतपणे अतिक्रमण केले असून माडये यांनी याबाबत निर्मलनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. मालमत्तेच्या विकासासाठी आवश्यक रक्कम स्वराज असोसिएट किंवा माडये यांच्याकडे नसल्याने ते गुंतवणूकदाराच्या शोधात होते.
सेठिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीसह कंपनीचे संचालक बसंतराज सेठिया यांनी २०१० मध्ये मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. स्वराज असोसिएटचे भागीदार श्यामजी पटेल आणि रितेश पटेल यांनी मालमत्तेचा विकास करण्याऐवजी त्यांचा हिस्सा विक्री करण्यास इच्छुक असल्याने बसंतराज सेठिया यांनी त्यांचा हिस्सा विकत घेण्याची तयारी दाखविल्याने ऑक्टोबर २०१० मध्ये एक करार करण्यात आला.
करारानुसार जमीन, मालमत्ता माडये यांची राहणार होती आणि विकासासाठी लागणारा सर्व पैसा सेठिया इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनी पुरविणार होती. खर्च वजा करून होणाऱ्या नफ्यातून माडये यांचा हिस्सा ३० टक्के, तर बसंतराज सेठिया यांचा ७० टक्के हिस्सा राहणार होता. आगाऊ रक्कम म्हणून बसंतराज सेठिया हे माडये यांना १० कोटी रुपये देणार होते, पण त्यांनी साडेचार कोटी रुपये देत यातील दोन कोटी पाच लाख २० हजार रुपये विकासकामाचा खर्च म्हणून घेतले.
बसंतराज सेठिया आणि अक्षय कोठारी यांनी नियोजनबद्ध कट रचून फसवणूक करण्याच्या हेतूने प्रत्येक कृती केली. यात डिसेंबर २०१३ मध्ये माडये यांच्या नावाची खोटी ॲडमिशन कम रिटायरमेंट डिड तयार केली. त्याच्या माध्यमातून स्वराज असोसिएटमधून माडये यांना निवृत्त करून सेठिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना नवीन भागीदार म्हणून समाविष्ट करण्यात आले.
रितेश ओम्बाळकर आणि अन्य सह आरोपींच्या मदतीने बनावट व खोटा ठराव तयार करण्यात आला होता. खोटी व बनावट कागदपत्रे रजिस्टार ऑफ फार्म, नगर भुमापक कार्यालय, तसेच अन्य शासकिय कार्यालयात वापरण्यात आली. पुढे, मालमत्तेच्या प्रॉपर्टी कार्डवर माडये यांचे नाव कमी करून फेरफारनुसार नोव्हेंबर २०१७ मध्ये बसंतराज सेठिया यांचे नाव नोंद करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.