रेल्वेच्या नव्या वेळापत्रकात प्रवाशांची निराशा
नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश नसल्याने नाराजीः वाढीव लोकलची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मध्य रेल्वेने उपनगरी लोकलचे सुधारित आणि नवीन वेळापत्रक जाहीर केले. त्यात काही गाड्यांचा वेळा आणि ठिकाणेही बदललेली आहेत, मात्र कल्याण ते कसारा, कर्जत, खोपोलीसाठी लोकल फेऱ्या वाढलेल्या नाहीत. सीएसएमटी ते कल्याणदरम्यान एकही नव्या लोकलचा समावेश नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. यामुळे नव्या वेळापत्रकात जुनी निराशा, असा सूर प्रवाशांमध्ये उमटू लागला आहे.
कल्याण ते कसारा, कर्जत, खोपोली परिसरात लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत जात आहे. यामुळे उपनगरी लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत जात आहे. त्यानुसार लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी गेल्या वर्षांपासून केली जात आहे. विशेष म्हणजे बदलापूर व टिटवाळा प्रवासीसंख्या वाढती आहे. सामान्य लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. ठाणे स्थानकात प्रवास संपवणाऱ्या सहा लोकल फेऱ्यांचा विस्तार कल्याणपर्यंत करण्यात आला आहे. ही बाब स्वागतार्ह आहे, मात्र ठाण्यात ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्ग या दोन्ही प्रवाशांची गर्दी होते. हा विचार करता सहा लोकल फेऱ्या अत्यंत अपुऱ्या आहेत. ठाणे स्थानकातून कल्याण-कर्जत, खोपोली, कसारासाठी नवी लोकलचा समावेश नव्या वेळापत्रकात होणे अपेक्षित होते, मात्र ते झाले नसल्याने ठाण्यातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचे हे वेळापत्रक ''ना चांगले, ना वाईट'' अशा स्वरूपाचा प्रवास अनुभव देणारे ठरेल, अशी प्रतिक्रिया निरंजन पाटील यांनी दिली.
..................
चौकट
प्रवाशांची होणार धावपळ
मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रकात लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ केलेली नाही. उलट रात्रीच्या कसारा, कर्जत लोकल नियमितपणे वेळेपूर्वीच ६ ते १२ मिनिटे आधीच सोडण्यात येणार आहेत. परिणामी कसारा, कर्जतच्या प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी आणखी धावपळ करावी लागणार आहे. सीएसएमटी -कसारा लोकल दररोज रात्री १२.१४ वाजता, तर सीएसएमटी-कर्जत लोकल दररोज रात्री १२.२४ वाजता सुटते, मात्र, ५ ऑक्टोबरपासून सीएसएमटी– कसारा लोकल रात्री १२.०८ वाजता, तर सीएसएमटी-कर्जत लोकल रात्री १२.१२ वाजता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कसारा, कर्जत लोकल पकडण्यासाठी धावपळ करावी लागणार असल्याची प्रतिक्रिया गणेश गायकवाड यांनी दिली आहे. १५ डब्यांच्या नव्या लोकल ताफ्यात दाखल करून त्याने फेऱ्या वाढवणे नव्या वेळापत्रकात अपेक्षित होते. नव्या वेळापत्रकात या लोकलबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
.......
चौकट
दिव्यात नवी लोकल सुरू करण्याची मागणी
कळवा आणि मुंब्रा स्थानकात पिकवर्समध्ये जलद लोकलला थांबा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून कळवा आणि मुंब्रा येथील रेल्वे प्रवाशांनी केली होती. नवीन उपनगरी वेळापत्रकात काही जलद लोकलला कळवा आणि मुब्रामध्ये थांबे देण्यात आले, परंतु डोंबिवली आणि कल्याण येथून येणाऱ्या लोकल प्रवाशांनी भरून येत असल्याने प्रवाशांना चढता येत नाही. रेल्वेने दिवा स्थानकातून नवी लोकल सुरू केल्यास त्याचा फायदा कळवा, मुंब्रासह दिव्यातील नागरिकांना होणार आहे. त्यामुळे रेल्वेने त्याकडे लक्ष देणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.