वाणगाव, ता. ५ (बातमीदार) : भातशेतीमध्ये विविध किडींचे नैसर्गिक नियंत्रण करण्यामध्ये बेडकांचे अत्यंत महत्त्व आहे. त्याविषयी विविध ठिकाणी प्रयोगही झाले आहेत. बेडकांचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. बेडूक भातशेतीत किडींचे नियंत्रण करून शेतकऱ्यांना मदतच करतात. बेडकांची संख्या घटल्याने मलेरिया रोगाचा जोराने फैलाव सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीस बेडूक दिसू लागतात. पावसाळा संपताच पुढील मॉन्सून येईपर्यंत ते जमिनीत गाडून घेतात, याला सुप्तावस्था म्हणतात. संवर्धन करण्यासाठी शेताच्या बाजूच्या खोलगट भागात छोटे तळे तयार करावे. त्यात सुप्तावस्थेसाठी जागा मिळेल. बेडकांची संख्या कमी होऊ नये, यासाठी रासायनिक कीडनाशके आणि रासायनिक खतांचा होणारा अनियंत्रित वापर थांबवला पाहिजे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षणतज्ज्ञ उत्तम सहाने यांनी दिली.
बेडकांचे शेतीतील महत्त्व
आपल्या देशात ‘राना टायग्रीना’ आणि ‘फेजरवरया लीमनोचारिस’ या दोन प्रजातींचे बेडूक मोठ्या प्रमाणात भातशेतीत आढळतात. अळ्या, तुडतुडे, नाकतोडे, गोगलगाईंना ते खातात. बेडकांची शेतीत होणारी मदत लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेने जून ते सप्टेंबर या कालावधीत शेताच्या आजूबाजूच्या क्षेत्रात बेडूक पकडण्यावर प्रतिबंध घालण्यात यावा, अशी विनंती सरकारला केली आहे.
असे करते भक्ष्यांचा नाश
बेडकाच्या जबड्याची रचना पाहिली तर जिभेचे अग्रटोक खालील जबड्याच्या टोकाला चिकटलेले असते. मागील टोक मोकळे व दोन भागांत विभागलेले असते. कीटक दृष्टीस पडताच बेडूक आपली जीभ द्रुतगतीने त्याकडे फेकतो. जिभेत स्लेष्मा ग्रंथी असते. त्यामुळे ती चिकट असते. कीटक जिभेला चिकटताच बेडूक आपली जीभ आत ओढून घेतो व भक्षाला गिळून टाकतो. ही क्रिया अतिशय वेगाने होते. प्रति बेडूक रोज आपल्या वजनाइतके किंवा प्रति आठवड्यात सरासरी तीन हजार कीटक खातो.
बेडकांचे संवर्धन गरजेचे
१) पर्णकोष करपा रोगाचे प्रमाण (वाहक कमी झाल्याने) कमी होते.
२) जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते. जमीन सुपीक होऊन भाताची वाढ चांगली होते.
३) भाताच्या पानांमध्ये काही प्रमाणात हरितद्रव्य, विद्राव्य प्रथिने व साखरेचे प्रमाण वाढते.
४) जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.