बदलापूर, ता. ५ (बातमीदार) : वांगणी गावात राहणाऱ्या ज्ञानेश्वर वाघ या सातवर्षीय मुलाला सर्पदंश झाला. त्यावर ताबडतोब उपचार व्हावेत, यासाठी ज्ञानेश्वरच्या आई-वडिलांनी वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्या ठिकाणी प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले; मात्र यावेळी रुग्णवाहिका नसल्याने चक्क पालकांना लोकलने प्रवास करून आपल्या मुलाला रुग्णालयात न्यावे लागले. इतकेच नव्हे तर यादरम्यान ‘मुलाच्या जीवाला काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी आमची’ असे त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले.
कल्याणच्या पुढे अगदी बदलापूर ते खोपोली या परिसरात अचानक वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास आधुनिक उपचार पद्धती व सुविधा नाहीत. त्यामुळे अशावेळी रुग्णाला पुढील उपचारासाठी उल्हासनगर व पुढे कल्याण मुंबईत पाठवले जाते. अशीच परिस्थिती वांगणी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर वाघ या सात वर्षीय मुलावर ओढावली. ज्ञानेश्वरला विषारी सर्पाचा दंश झाला. यावेळी घाबरलेल्या त्याच्या पालकांनी वांगणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत ज्ञानेश्वरला उपचारासाठी नेले; मात्र तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी या मुलाला पुढील उपचारांसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्याचवेळी जाण्यापूर्वी रस्त्यात तुमच्या मुलाचे काही बरेवाईट झाले, तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल, असे लिहून घेतले. मुलाचे आई-वडील अशिक्षित असल्याने त्यावर चक्क मुलाच्या आईचा अंगठा घेतला. शिवाय, आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने सर्पदंश झालेल्या ज्ञानेश्वरला घेऊन पालकांना लोकलने प्रवास करत रुग्णालय गाठण्याची वेळ आली.
ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका हवी असल्यास एक हजार रुपये द्यावे लागतील, असेही त्यांना सांगण्यात आले; मात्र वाघ कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना ग्रामसेवकाकडून २०० रुपये घेऊन लोकलने मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली. दरम्यान, या संतापजनक प्रकारामुळे वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. सध्या ज्ञानेश्वरवर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.