मुंबई

गारेगार प्रवासाची पर्वणी

CD

गारेगार प्रवासाची पर्वणी
- एसी लोकल, बेस्ट, उन्नत मेट्रोनंतर आता भुयारी मेट्रो सेवेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना एसी लोकल, बेस्टची वातानुकूलित बस, उन्नत मेट्रोनंतर आता भूमिगत मेट्रोतून गारेगार प्रवास करण्याची पर्वणी मिळणार आहे. दहा वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो अशी ओळख असलेल्या मेट्रो-३च्या बीकेसी-आरे कॉलनी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे मुंबईकरांना आता मुंबईच्या पोटातून वाहतूक कोंडीशिवाय प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गावर दररोज साडेचार लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज आहे.
राज्यात २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी कफ परेड- बीकेसी- आरे या सुमारे ३३ किलोमीटर लांबीच्या भूमिगत मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पार पडले होते. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी मेट्रो सेवा सुरू झाली आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाढलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीने मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात लटकंती होते. त्यातच आता भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, हा संपूर्ण मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर लोकल ट्रेनबरोबरच बेस्ट बस रिक्षा आणि टॅक्सीवरील भार कमी होणार असून दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या एका तासावर येणार आहे. तर, सध्या बीकेसी ते आरेदरम्यानच्या प्रवासाला एक-दीड तास लागत असून मेट्रोने अवघ्या पंधरा-वीस मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.

या ठिकाणची वाहतूक कोंडी फुटणार
भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाल्याने वाद्रे-कुर्ला संकुल, कलानगर, सांताक्रूझ, विमानतळ परिसर, मरोळ नाका, अंधेरी पूर्व, एमआयडीसी, सिप्झ येथील प्रवाशांना सहजपणे मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या परिसरात होणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

भूमिपूजन, लोकार्पणाला विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त
मुंबईकर मेट्रो ३चा बीकेसी- आरे या पहिल्या टप्प्याची एप्रिलपासून प्रतीक्षा करत आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या नेत्यांनी मेट्रो सुरू करण्याबाबत तारखाही जाहीर केल्या होत्या; मात्र मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने ही मेट्रो सेवा अद्याप सेवेत आली नव्हती. सुरक्षा आयुक्तांनी मागील दोन दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र दिल्याने राज्य सरकारसह एमएमआरसीएलने लोकार्पण कार्यक्रम उरकला आहे. दरम्यान, मेट्रोच्या कामाच्या भूमिपूजनाला २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त मिळाला होता. त्यानंतर आता लोकार्पणही विधानसभा निवडणुकीच्या आधी पार पडले आहे. त्यामुळे हे दोन्ही योगायोग राजकीयदृष्ट्या जुळवून आणले नाहीत का, अशी मुंबईकरांमध्ये कुजबुज आहे.

३७ हजार कोटींचा खर्च
आरे- कफ परेड या प्रकल्पाचा २०११ मध्ये डीपीआरनुसार २३ हजार ९०० कोटी रुपये एवढा खर्च होता; मात्र वेळोवेळी मेट्रो स्थानकाच्या एंट्री पॉइंटमध्ये करावा लागलेला बदल आणि विलंबामुळे खर्चात जवळपास साडेतेरा हजार कोटी रुपये एवढी मोठी वाढ होऊन तब्बल ३७ हजार २७६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, संपूर्ण मेट्रो प्रकल्पावर आतापर्यंत तब्बल ३० हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

असे असेल तिकीट दर
आरे ते अंधेरी एमआयडीसी- १० रुपये, आरे ते मरोळ नाका- २० रुपये, आरे ते छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ (टी-२, टी-१)- ३० रुपये, आरे ते सांताक्रूझ, वांद्रे काॅलनी- ४० रुपये, आरे ते बीकेसी- ५० रुपये

मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाल्याने बीकेसी, सांताक्रूझ, मरोळ नाका, एमआयडीसी परिसरात होणारी वाहतूक कोंडी निश्चितच फुटणार आहे; मात्र मेट्रो स्थानक परिसरात एमएमआरसीएलने बस सर्व्हिस सुरू करणे आवश्यक आहे.
- गाॅडफ्रे पिमेंटा, वाहतूकतज्‍ज्ञ

आरे-बीकेसी भूमिगत मेट्रोमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून बीकेसी, एमआयडीसी, एअरपोर्टवर रिक्षा- टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी मेट्रोचा वापर करतील.
- अनिल गलगली, सामाजिक कार्यकर्ते

वांद्रे-कुर्ला परिसरात रिक्षावाल्यांकडून मनमानीपणे प्रवाशांकडून भाडे उकळले जाते. मेट्रो सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. मेट्रो वनलाही मेट्रो-३ची कनेक्टिव्हिटी असल्याने बीकेसीवरून ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांना मेट्रो-३ आणि पुढे मेट्रो वनने घाटकोपरला सहजपणे पोहोचणे शक्य होणार आहे.
- जीवन कांडुभौरी, प्रवासी

पहिल्‍या टप्प्यात नऊ मेट्रो धावणार
पहिल्या टप्प्यात आठ डब्यांच्या नऊ मेट्रो ट्रेनच्या माध्यमातून ९६ फेऱ्या चालवल्या जातील. सकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा या वेळेत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. सुटीच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता मेट्रो सुरू होईल. मेट्रोचे सारथ्य करण्यासाठी ४८ चालक असून त्यामध्ये १० महिलांचा समावेश आहे. सुमारे साडेसहा मिनिटाला एक याप्रमाणे दिवसभरात ९६ फेऱ्या चालवल्या जातील. ताशी ३५-४० किलोमीटर वेगाने ट्रेन धावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

‘कुरळे ब्रदर्स’ची धमाल आता घरबसल्या! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आता ओटीटीवर, कधी कुठे पाहाल?

नागपूरमध्ये ९० टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत? खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, आणणार नवं धोरण!

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

SCROLL FOR NEXT