सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (ता. ७) सायंकाळी सहा वाजता विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. पालिका आणि जिल्हा नियोजन समिती यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या विकासकामांचा यामध्ये समावेश आहे.
दादर (पश्चिम)मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात भागोजी कीर यांचे प्रस्तावित स्मारकानजीक हा मुख्य सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मुंबादेवी परिसर तसेच महालक्ष्मी परिसरातील कामांचे भूमिपूजन, अँटॉप हिलमध्ये जगन्नाथ शंकरशेट स्मारकाचे भूमिपूजन, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील भागोजी शेठ कीर स्मारकाचे भूमिपूजन, जे.जे. उड्डाणपुलाखाली बेस्ट बसमध्ये निर्मित कलादालन व वाचनालयाचे लोकार्पण, बधवार पार्क येथील फूड ट्रकचे लोकार्पण, माहीम कोळीवाडा येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या पदपथ (प्रॉमेनेड) व संरक्षक भिंतीचे सुशोभीकरणाचे भूमिपूजन, माहीम कोळीवाडा येथील अरुणकुमार वैद्य मार्गालगत पदपथ (माहीम ट्रॅफिक चौकी ते वांद्रे उदंचन केंद्रापर्यंत) सुशोभीकरणाचे भूमिपूजन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मुंबई शहरात पर्यटन, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी आकांक्षी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. विधानभवन, लायन गेट, उच्च न्यायालयासमोर के. बी. पाटील मार्ग, फॅशन स्ट्रीट खाऊ गल्ली, बाणगंगा वाळकेश्वर, अरुणकुमार वैद्य मार्ग माहीम रेतीबंदर समुद्रकिनारा या ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. त्यांचेही भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच, वरळी दुग्धशाळा आवारातील बांधकाम, मुंबई सेंट्रल बसस्थानक येथे वाहनचालकांसाठी असलेल्या कक्षाच्या नूतनीकरणाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.
-----
या कामांचाही समावेश
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील नगर चौक, फॅशन स्ट्रीट, ग्रँट रोड रेल्वे स्थानक (पश्चिम) येथील ‘पिंक टॉयलेट’चे, तसेच महापालिकेच्या १०३ शाळांतील टेरेस गार्डन व सीसीटीव्ही कॅमेरा कामांचे लोकार्पण
- जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नायगाव, वरळी, कुलाबा, माहीम, भायखळा, शिवडी, शीव (सायन) येथील पोलिस वसाहतींचे लोकार्पण आणि भूमिपूजन, कामगार कल्याण क्रीडा मंडळ येथील नूतनीकरण, जलतरण तलावाचे उद्घाटन
- सर ज. जी समूह रुग्णालयातील कॅथलॅब यंत्रसामग्री आणि नूतनीकरण केलेल्या वॉर्डचे लोकार्पण, कामा व आल्बेस रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्र, बालसुधारगृह आणि उमरखाडी, डोंगरी, डेविड ससून येथील बांधकामांचे लोकार्पण, पोद्दार रुग्णालय (वरळी) येथील कामांचे भूमिपूजन होणार आहे.
- मत्स्यव्यवसायअंतर्गत माहीम, वरळी, कुलाबा येथील कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन; हाजी अली येथील विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन; मुंबई मध्यवर्ती ग्रंथालयात डिजिटल ग्रंथालय तसेच कॉम्पॅक्टर उपलब्धतेचे लोकार्पण या कामांचा यात समावेश आहे.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.