सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण कार्यक्रमासह विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला एक लाख नागरिकांनी हजेरी लावली. यावेळी ४५ महिला तसेच पुरुषांना रक्तदाबासह चक्कर आल्याने आरोग्य यंत्रणेची दमछाक झाली.
घोडबंदर भागातील बोरीवडे येथे जिल्ह्याभरातून एक लाख नागरिक आले होते. संध्याकाळी चार वाजता पंतप्रधान मोदी येणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना दुपारी एक वाजताच सभास्थळी बोलावण्यात आले होते. यावेळी उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला खाण्याची पाकिटे, पाणी देण्यात आले होते. तसेच कार्यक्रमस्थळावर हवा खेळती राहावी, याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, तरी देखील ४५ जणांना उन्हामुळे चक्कर तसेच रक्तदाबाचा त्रास झाला. त्याच्यांवर तात्काळ उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.
-----------------------------------------
रेमंड येथे स्थानिकांचे आंदोलन
ठाण्यातील रेमंड येथील भूखंडावर पालिकेची नवीन वास्तू उभारण्यात येणार आहे. यासाठी जागेवरील आरक्षण बदलल्याने प्रकल्पाला विरोध आहे. तरी देखील शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते पालिकेच्या नवीन मुख्यालयाच्या कामाचे भूमिपूजन झाल्याने स्थानिकांनी शांततेत आंदोलन केले.
-----------------------------------------------
सॅटिसवर प्रवाशांच्या रांगा
ठाणे परिवहन सेवेच्या काही मार्गांवर बससाठी रोजच तासंनतास वाट पाहणारे प्रवासी शनिवारी अक्षरशः कंटाळलेले होते. पतंप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी दोनशेपेक्षा अधिक बस वापरण्यात आल्याने ठाणे स्टेशनपासून गायमुख कासारवडवलीपर्यंत बसने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाली. त्यामुळे अनेकांनी बसएेवजी रिक्षाचा पर्याय निवडावा लागल्याने नाहक भुर्दंड बसल्याची संतप्त प्रतिक्रिया ठाणेकरांनी दिली.
-----------------------------------
ठाकरे गटाची खोचक टीका
सॅटिस पुलावर संध्याकाळी घरी परतणाऱ्या ठाणेकरांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ट्विट करत शिंदे गटाला डिवचले. तसेच मोदींच्या कार्यक्रमासाठी टीएमटीच्या बस वापरत सर्वसामान्य ठाणेकरांना वेठीस धरल्याची टीकाही केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.