मुंबई

काठावर असलेल्या आमदारांसमोर आव्हान

CD

काठावरील आमदारांसमोर आव्हान
कल्याण ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, उल्हासनगर डेंजर झोनमध्ये
हेमलता वाडकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची परीक्षा देण्यासाठी सर्वच मतदारसंघात राजकीय पक्षांच्या इच्छुकांची गर्दी वाढत आहे. अशावेळी जे विद्यमान आमदार आहेत, त्यांनाही या वेळी गेल्या निवडणुकीच्या मेरीटवर तिकीट देण्याची आखणी बहुतेक सर्वच पक्षांनी केली आहे. अशावेळी ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी कल्याण ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, उल्हासनगर या चार विधानसभा मतदारसंघातील आमदार सध्यातरी डेंजर झोनमध्ये दिसत आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत अगदी १५ हजार मतांच्या फरकाने ते उत्तीर्ण झाले होते. त्यात आता बदललेल्या राजकीय समीकरणामुळे त्यांची हक्काची मतेही विभागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा उमेदवारी मिळाल्यास त्यांना मताधिक्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे व कल्याण या दोन लोकसभा शिवसेना शिंदे गटाने जिंकून आपला वरचष्मा कायम ठेवला आहे, पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हा करिष्मा कायम ठेवणे खरे आव्हान ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १८ जागा आहे. त्यामुळे सत्तेचे गणित जुळवण्यासाठी या जिल्ह्याला महत्त्व आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकसंघ असलेल्या शिवसेनेचे पाच, भाजपचे नऊ, मनसेचा एक, राष्ट्रवादीचे दोन आणि सपाचा एक आमदार निवडून आला होता. २०२२ नंतर बदललेल्या राजकीय समीकरणामुळे सध्याच्या घडीला शिवसेना शिंदे गटाकडे पाचही आमदार आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडे एकही आमदार नाही, तर राष्ट्रवादीच्या दोन आमदारांपैकी प्रत्येकी एक-एक आमदार शरद पवार आणि अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळे २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीवरून २०२४ चा अंदाज बांधताना अनेक पैलूंचा विचार करावा लागेल. विशेष म्हणजे १५ हजारहून कमी मताधिक्यांनी जे उमेदवार निवडून आले किंवा ज्यांनी सर्वाधिक मताधिक्य घेतले आहे, त्या मतदारसंघाची परिस्थिती बदलली आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुटीमुळे जिल्ह्यातील भाजप आमदारांची संख्या कायम असली तरी काहींना यंदाचा ‘पेपर’ जड जाण्याची शक्यता आहे. विशेषतः कल्याण ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि उल्हासनगर या चार विधानसभात जेथे विद्यमान आमदारांचे मताधिक्य कमी होते, तेथे लोकसभा निवडणुकीनंतर धोक्याची घंटा वाजली आहे.

कल्याण ग्रामीणवर शिंदे गटाचा डोळा
कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मनसेचे प्रमोद उर्फ राजू पाटील करत आहेत. मनसेचा एकमेव आमदार या विधानसभा मतदारसंघातून निवडून आला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजू पाटील ९३ हजार ९२७ मते घेऊन निवडून आले. शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना ८६ हजार ७७३ मते मिळाली होती. विजयाचे अंतर केवळ सात हजार १५४ इतके होते. या निवडणुकीत शिवसेनेने आयत्यावेळी उमेदवार बदलला. तत्कालीन विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिल्यानंतर अचानक भूमिका बदलली. त्याचा फटका बसला आणि शिवसेनेच्या हातची जागा मनसेच्या पारड्यात पडली. लोकसभा निवडणुकीत आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी मेहतन घेतली. त्यामुळे त्यांना शिंदे गटाची साथ मिळेल व विजय सुकर होईल, असा कयास बांधला जात होता, पण आता खुद्द शिवसेना शिंदे गटातूनच अर्धा डझन इच्छुक ही जागा लढवण्यासाठी बाशिंग बांधून आहेत. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष भोईरही मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा कोण पटकावतो, यावर पुढील राजकीय घमासान अवलंबून आहे. राजू पाटील यांचा मतदार बांधलेला आहे, पण शिंदे गटानेही जर उमेदवार दिला, तर शिवसेनेच्या मतांत फूट पडू शकते. राजू पाटील यांना शिवसेना शिंदे गटाची अप्रत्यक्ष मदतही ठरू शकते.

उल्हासनगरात कलानी फॅक्टर
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपचे कुमार आयलानी आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना ४३ हजार ६६६ मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांना दुसऱ्या क्रमांकाची ४१ हजार ६६२ मते मिळाली होती. दोघांच्या मतांमधील अंतर केवळ एक हजार ८६३ इतकेच होते. अगदी निसटता पराभव कलानी कुटुंबाच्या वाटेला आला होता. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत येथे राजकीय गणित बदलण्याची शक्यता दाट आहे. उल्हासनगरच्या राजकारणात पप्पू कलानी यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. २०१४ च्या निवडणुकीत पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्योती कलानी ४३ हजारांहून अधिक मतांनी निवडून आल्या होत्या, पण हे मताधिक्य त्यांना टिकवून ठेवता आले नाही आणि शिवसेना-भाजप युतीमुळे त्यांना २०१९ च्या निवडणुकीत पराभवला सामोरे जावे लागले; मात्र आता तुरुंगातून बाहेर आल्यावर पप्पू कलानी पुन्हा राजकीय क्षेत्रात सक्रीय झाले आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार गट आणि भाजपशी त्यांनी सलोखा राखला आहे. त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांना मदत केली. ओमी कलानी या वेळी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे तिहेरी फायदा त्यांना मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी सध्या डेंजर झोनमध्ये आहेत.

भिवंडी पूर्वमध्ये मविआत रस्सीखेच
मुस्लिमबहूल मतदारसंघ असला तरी शिवसेनेचा हा पूर्वापार बांधलेला मतदारसंघ मानला जातो. शिवसेनेचे रुपेश म्हात्रे २०१४ मध्ये युती तुटलेली असतानाही निवडून आले होते; मात्र २०१९ मध्ये युती असताना म्हात्रे यांना पराभवाचा सामना करावा लागला. समाजवादीचे रईस शेख यांना विजयाची लॉटरी लागली. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतांचा विचार केला, तर शेख यांना ४५ हजार ५३७ तर रुपेश म्हात्रे यांना ४४ हजार २२३ मते मिळाली. म्हणजे केवळ एक हजार ३१४ मतांचा दोन उमेदवारांच्या मतांमध्ये फरक होता.
२०२४ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा हा पूर्वापार मतदारसंघ आहे. रुपेश म्हात्रे यांनी शिवसेना ठाकरे गटाशी नाळ जोडून ठेवली आहे. त्याचा फायदा त्यांना या वेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून रुपेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय सुकर समजला जातो, पण इथेच सर्व गोम आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना विजयाचा मार्ग मोकळा करून दिला, पण आता खासदार झाल्यानंतर बाळ्या मामा आपली राजकीय ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी भिवंडी पूर्व हा मतदारसंघावर त्यांचा पक्ष दावा ठोकू शकतो. काँग्रेसही येथे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यामुळे आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीचा चेहरा अजून ठरलेला नाही. आयत्यावेळी शिवसेना शिंदे गट कोणतीही खेळी करू शकते. त्यामुळे सध्या या मतदारसंघाबाबत कोणतेही भाकीत करणे शक्य नसले तरी सपाचे रईस शेख यांना विजय कायम राखून ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल इतके मात्र निश्चित समजले जाते.

भिवंडी पश्चिममध्ये परिवर्तनाचा कयास
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने पाय रोवलेल्या भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे सलग दोनवेळा आमदार म्हणून निवडणून आलेले भाजपचे महेश चौघुले यांना विजयाची हॅट्ट्रिक कठीण मानली जात आहे. वास्तविक २००९ मध्ये सपाचा आमदार या मतदारसंघात निवडून आला होता. २०१४ मध्ये मोदी लाटेत युती फिस्कटली आणि भाजपचे महेश चौघुले निवडून आले. चौघुले यांना ४२ हजार ४८३ मते मिळाली. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत चौघुले यांच्या मतांमध्ये वाढ झाली. त्यांना ५८ हजार ८५७ मते मिळाली, पण अपक्ष उमेदवार असलेल्या गुड्डू खालीद यांनी त्यांना कडवी झुंज दिली. या दोघांमधील मतांचे अंतर १४ हजार ९१२ इतके होते. एका अपक्षाने भाजपच्या विद्यमान आमदाराला घाम फोडल्याने ही निवडणूक महत्त्वाची मानली गेली. २०२४ मध्येही ही लढाई भाजप आणि आमदार महेश चौघुले यांच्यासाठी तितकीच कठीण मानली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व सहा विधानसभांपैकी सर्वात कमी मते या मतदारसंघातून मिळाल्याने कपिल पाटील यांच्या विजयाची हॅट्ट्रिक हुकली. त्यामुळे येथे भाजपचे वर्चस्व कमी झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही संधी राष्ट्रवादी शरद पवार गट साधणार असल्याचे दिसते. काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा ठोकला आहे, पण बाळ्या मामाचे वाढते वर्चस्व पाहता या मतदारसंघात परिवर्तन घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT