दसऱ्याच्या सोन्यातही बनावटगिरी
आपट्याऐवजी कांचन पानांची विक्री
ठाणे शहर, ता. ९ (बातमीदार) : दसऱ्याला वडीलधाऱ्यांना आपट्याची पाने सोनं म्हणून देण्याची प्रथा आहे. एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी या पानांचा वापर करतात. त्यामुळे बाजारात त्यांची मोठी मागणी असते, पण आता अशा पानांतही बनावटगिरी होत असल्याचे समोर आले आहे. दुर्मिळ होत चाललेल्या आपट्याच्या पानांऐवजी विक्रेते कांचन नामक झाडांची पाने ग्राहकांच्या माथी मारत आहेत. त्यामुळे भाविकांच्या भावनेशी खेळल्या जाण्यासारखाच हा प्रकार आहे.
नवव्या दिवशी नवरात्रोत्सवाची सांगता होताच दहाव्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जातो. या सणाला एकमेकांना शुभेच्छा, आशीर्वाद देण्या-घेण्यासाठी आपट्याच्या झाडांची पाने एकमेकांना भेट देतात. या दिवशी आपट्याच्या पानांना सोन्याची पाने म्हटले जाते. त्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे. शहरात जंगलांची कमतरता असल्याने आपट्याची झाडे पाहायला मिळत नाहीत. त्यासाठी ग्रामीण भागातून या कागदांची पाने विक्रीसाठी शहरात आणली जातात; मात्र गेली अनेक वर्षे आपट्यांच्या पानांचा शुभेच्छासाठी वापर होत आहे, तसेच त्यासाठी आपट्याच्या झाडांची छाटणी होत असल्याने ही झाडे दुर्मिळ होत चालली आहेत. परिणामी बाजारातील आपट्याच्या पानांची टंचाई दूर करण्यासाठी काही विक्रेत्यांकडून कांचन (कॅमलफूट) झाडांच्या पानांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. आपट्याचे आणि कांचनाची झाडे जंगलात वाढतात. अनेकदा नवखे विक्रेते आपटा समजून कांचन झाडाच्या फांद्या तोडतात आणि बाजारात विक्रीला आणतात, तर अनेक विक्रेते आपट्याची पाने सहज उपलब्ध होत नाहीत म्हणून आपट्याच्या नावे कांचन झाडाची पाने विकतात.
कॅमल फूट ट्री नाव :
विजया दशमीच्या दिवशी बाजारात आपट्याच्या पानासारखीच दिसणारी कांचन वृक्षाची (कॅमल फूट ट्री) पाने विकायला येतात. या पानांचा आकार उंटाच्या पायासाराखा असतो म्हणून त्याला कॅमल फूट ट्री हे नाव पडले आहे. ही झाडे उद्यानात किंवा पानथळ जागेत वाढवली जात असून बहूतांशी ठिकाणी आपट्याच्या झाडांऐवजी अशीच झाडे लावली जातात.
उद्यान शास्त्रात कांचन वृक्षाच्या अनेक प्रजाती आहेत. पैकी आपटा हे झाड जंगलात वाढते. ठाणे जिल्ह्याबरोबर पश्चिम घाटात ही झाडे आढळतात. या झाडाला पाणी कमी लागते. ते रुक्ष असते. त्याची पानेही आखुड, गोलाकार आणि खरखरीत असतात. या उलट कांचन झाडाची पाने आपट्याच्या पानापेक्षा आकाराने मोठी असतात. ही पाने कोमल आणि गुळगुळीत असल्यामुळे सहज ओळखता येतात. त्यांचा आकार उंटाच्या पायांचा असतो. मात्र दोन्ही झाडांना आयुर्वेदात औषधी झाडे म्हणून महत्त्व आहे.
- डॉ. नागेश टेकाळे, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.