जव्हार, ता. १७ (बातमीदार) : आदिवासी आणि ग्रामीण अशा जव्हार तालुक्यात सरकारच्या कल्याणकारी योजनांद्वारे येथील जीवनमान विकसित होऊ लागले आहे. राज्य तथा केंद्र सरकारचे शिक्षणाचे धोरण येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देऊन आर्थिक उन्नती होण्यासाठी नाना प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आठवीसाठी एनएमएमएस ही स्पर्धा परीक्षा डिसेंबर महिन्यात होणार असून, त्यासाठी ५ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्जाला सुरुवात झाली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना पुढील करिअर घडवण्यासाठी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तालुक्यातील सुमारे १५० विद्यार्थी आपले भवितव्य पणाला लावत असल्याची माहिती जव्हार येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमानांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य मिळावे. त्यानुसार विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी; तसेच प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखण्याच्या उद्देशाने शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) घेण्यात येते. पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपयाप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. कोणत्याही शासकीय, सरकारमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील आठवीत शिकत असलेल्या आणि अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येते.
आवश्यक अर्हता
नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदार, तलाठ्यांचा २०२३-२४च्या आर्थिक उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा लागणार आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी सातवीत किमान ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचित जाती, जमातीचा विद्यार्थी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेतून करण्यात येणार आहे. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व मागासवर्गीयांच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. २२ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
परीक्षेसाठी दोन विषय
बौद्धिक व शालेय क्षमता चाचणी, परीक्षेसाठी असे दोन विषय असणार आहेत. बौद्धिक क्षमता चाचणी ही मानसशास्त्रीय चाचणी असून, यामध्ये कार्यकार णभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमांवर आधारित राहणार आहे. यात सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, तीन विषय असतील. तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
यांना शिष्यवृत्ती नाही
सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येते. मात्र, विनाअनुदानित शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय वसतिगृहात सवलतीचा, भोजन व्यवस्था व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी व सैनिकी शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.