मातामृत्यू दर कमी करण्यासाठी स्त्रीरोग डॉक्टरांचा पुढाकार
केंद्र सरकारच्या एनएबीएचच्या सहकार्याने राबवणार मान्यता उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मातामृत्यू दराचे प्रमाण अधिक आहे. गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये असलेल्या जागरूकतेच्या अभावामुळे महिला अनेकदा उपचारांमध्ये टाळाटाळ करतात. त्यामुळे प्रसूतीवेळी महिलांना गंभीर समस्या उद्भवतात. यावर मात करण्यासाठी देशातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी एकत्रित येत केंद्र सरकारसोबत पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, भारत सरकारच्या ‘वन नेशन, वन स्टॅण्डर्ड’ या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी देशातील सर्व प्रसूतिगृहांमध्ये माता आरोग्य दर्जा मानकांची अंमलबजावणी करण्याबरोबरच येथील डॉक्टर, परिचारिका आणि कक्षसेवक यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
मानकांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रसूतिगृहांना नॅशनल ॲक्रिडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सची (एनएबीएच) मान्यता मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव, गुंतागुंत, उच्च रक्तदाब, असुरक्षित गर्भपात अशा विविध कारणांमुळे देशामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात मातांचे मृत्यू होतात.
२०३० मध्ये मातामृत्यूंचे प्रमाण एक लाख महिलांमागे ७० इतके कमी करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सरकारच्या या उपक्रमात देशातील स्त्रीरोगतज्ज्ञांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलिजल सोसायटीज ऑफ इंडिया (फॉग्सी)सुद्धा सहभागी झाली आहे.
देशातील एकूण प्रसूतीच्या ४० टक्के प्रसूती या खासगी रुग्णालयांमध्ये किंवा प्रसूतिगहांमध्ये होत असतात, मात्र देशातील बहुतांश प्रसूतिगृहामध्ये सुविधांचा अभाव आढळून येतो, तसेच येथील डॉक्टर, परिचारिका आणि कक्षसेवक यांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने अवघड प्रसूतीवेळी योग्य उपचार न झाल्याने माता मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘फॉग्सी’ने त्यांच्या ‘मान्यता’ या उपक्रमाद्वार केंद्र सरकारच्या एनएबीएचसोबत एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मान्यता’ उपक्रमांतर्गत प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे फॉग्सीचे माजी अध्यक्ष मान्यता उपक्रमाचे प्रमुख प्रशासक डॉ. हृषिकेश पै यांनी सांगितले.
देशातील प्रसूतिगृहांमध्ये माता आरोग्य दर्जा मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी फॉग्सीकडून २०१७ पासून ‘मान्यता’ उपक्रम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या उपक्रमांतर्गत जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या २२ मानकांपैकी १६ मानकांवर काम करण्यात आले, मात्र आता ही संख्या वाढवून २० पर्यंत नेण्यात आली आहे. याच कालावधीत देशातील ५० हजार प्रसूतिगृहांपैकी तीन हजार प्रसूतिगृहांमध्ये याची अंमलबजावणी करण्याबरोबरच १० लाख महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात यश आले असून, आता हा उपक्रम केंद्र सरकारच्या एनएबीएचच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती फॉग्सीच्या माजी अध्यक्ष व खजिनदार डॉ. रिष्मा पै यांनी दिली.
प्रत्येक मातेला तिच्या प्रसूतीच्या ठिकाणानुसार सुसंगत उपचार मिळावेत यासाठी सर्व प्रसूतिगृहांमधील एकसमान मानके असणे अत्यावश्यक आहेत. एनएबीएचच्या कार्यक्रमांमध्ये प्रसूतिगृहांना मान्यता देण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे, तेथील उपचार अधिक दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.
रिझवान कोइता,
अध्यक्ष एनएबीएचच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.