पनवेल, ता. १७ (बातमीदार) : विधानसभा निवडणुकांसाठी मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या प्रचाराची सांगता सोमवारी सायंकाळी होणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास हातात असतानाच शेवटच्या रविवारचा बोनस मिळाल्याने सर्वच उमेदवार कार्यकर्त्यांसह आज रस्त्यावर उतरलेले दिसले. बाईक रॅली, भव्य मिरवणुका, घरोघरी गाठीभेटींच्या धुरळा उडालाच; पण गल्लीबोळ्यात फिरणाऱ्या प्रचार गाड्यांनी वेग घेतला. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असली तरी एकंदरीतच मतदानाआधीचा शेवटचा रविवार हा सुपर संडे ठरला.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. नवी मुंबईतील ऐरोली, बेलापूरसह पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघात
महायुती विरुद्ध महायुती असा सामना रंगला आहे. दोन्ही युती, आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून एकमेकांना जबरदस्त टक्कर देत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात पत्रकार परिषदा, चौक सभा, मेळावे घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी रस्त्यावर उतरवण्यात आली. उमेदवार आपआपले प्रमुख नेते आणि स्टार प्रचारकांसह मिवणुका काढताना दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार; तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा गाजल्या. त्यामुळे राजकीय वातावरणही तापले आहे.
-------------
प्रचारासाठी काहीच तास शिल्लक
जाहीरनामा, वचननामा घराघरात पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही सुरू आहेत. एकीकडे सभांचा धुरळा, तर दुसरीकडे रस्त्यांवरून फिरणाऱ्या प्रचाररथांच्या आवाजामुळे निवडणूक प्रचाराची रंगत वाढली आहे. निवडणूक प्रचाराची रंगत वाढत असतानाच त्याच्या सांगताचे काऊंटडाऊनही सुरू झाले आहे. सोमवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. त्यामुळे प्रचार सांगताच्या आधी आलेला रविवार सर्वच उमेदवारांनी सार्थकी लावल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात रॅली, दुपारी प्रचार रथ, गाठीभेटी घेण्यात आल्या.
---------------
ठाकूर, पाटील, गरड यांचा झंझावात
पनवेल विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत असली तरी महाविकास आघाडीमध्ये झालेली बिघाडी ही महायुतीला काही प्रमाणात उपकारक ठरल्याचे एकंदरीत वातावरणातून दिसून आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सभा घेतल्या. अखेरच्या रविवारी बाळाराम पाटील यांनी रोहिंजन या गावाला भेट देत मतदारांना साकडे घातले. त्याचबरोबर त्यांना काही संघटनांनी पाठिंबा देऊन शुभेच्छा दिल्या. त्या स्वीकारण्यासाठी कामोठे वसाहतीत त्यांनी हजेरी लावली. सायंकाळी ठिकठिकाणी त्यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार लीना गरड यांच्या प्रचारार्थ कामोठे आणि खारघर येथे बाईक रॅली काढण्यात आली होती.
----------------
उरणमध्ये चुरस
उरण विधानसभा मतदारसंघात शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन अनेकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. सकाळ-सायंकाळ बैठका आयोजित करून ग्रामीण भाग पिंजून काढला जात आहे. तरुणाईकडून त्यांच्या प्रचारार्थ जोरदार रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दुसरीकडे मनोहर भोईर व भाजपचे महेश बालदी यांनी आपल्या विजयासाठी रविवारच्या सुटीची संधी साधून जोरदार प्रचार केला.
--------------
बेलापुरात प्रचाराचा धुरळा
भाजपच्या मंदा म्हात्रे, मनसेचे गजानन काळे, शरद पवार गटाचे संदीप नाईक, अपक्ष डॉ. मंगेश आमले यांनी बेलापूर मतदारसंघातील प्रत्येक विभागात रविवारी मोठे शक्तिप्रदर्शन केले. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी रॅलीच्या माध्यमातून मतदारांना आपणाला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
-------------
ऐरोलीत रॅली, प्रचार सभा
भाजपचे गणेश नाईक, मविआचे एम. के. मढवी आणि शिंदे गटाचे बंडखोर विजय चौगुले यांनी रविवारी आपल्या प्रचार सभांचा धडाका लावला. दुचाकी रॅलीच्या माध्यमातून मतदारांचे लक्ष वेधून घेतले. चौकाचौकांत सभा घेऊन विविध योजनांची व कामांची आश्वासने देण्यात आली. त्यामुळे ऐरोली परिसर उमेदवारांच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.