कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : पोलिसी पेहराव मात्र तोंडातून येणारे शब्द, चेहऱ्यावरील हावभाव अशा विविध नकला करून उपस्थित महिला, पुरुषांसह बालगोपाळांना पोट धरून हसायला लावणारा बहुरूपी काळानुरूप नामशेष होत आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने होणारे शहरीकरण, नागरीकरण हे कारणीभूत असल्याचे बहुरूपींचे म्हणणे आहे. तर गाव-खेड्यांचा बदलता नूर पाहता बिदागीसाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
बहुरूपी म्हणजेच बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणारा नकलाकार. दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यांत गावोगावी फिरून ते आपले पोट भरतात. खाकी शर्ट-पॅन्ट, टोपी, शिटी असा पोलिसी पेहराव पाहून प्रथमदर्शनी लोक त्यांना घाबरतात. पण, त्यांच्याकडून शब्दांची होणारी फेकाफेकी, अभिनय, यामुळे आपसुकच शाब्दिक व वस्तुनिष्ठ विनोदाची निर्मिती होते. अन् लोकांनाही ती आवडते. त्यांच्यासाठी भटक्या समाज बहुरूपी संघ नावाची एक संघटना आहे. भटक्या-विमुक्तांचे समाज लोकनेते जी. जी. चव्हाण यांनी बहुरूपी लोकांना एक प्रमाणपत्र देऊन व्यवसाय करण्याची संधी दिली आहे. हे प्रमाणपत्र दाखवत आपण बहुरूपी असल्याचे ते लोकांना सांगतात. पाच, दहा रुपये, जेवण जे काही मिळेल, ते स्वीकारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, भटक्या समाज बहुरूपी संघ ही संघटना केवळ प्रमाणपत्र देऊन मोकळी होते; मात्र पुढे आमच्या आयुष्याचे काय? असा प्रश्नही या बहुरूपींना पडला आहे.
शेतकऱ्यांकडून धान्य
कल्याण ग्रामीण भागातील फळेगाव, रूंदे उशिंद, कोशिबी आदी भागांत बहुरूपी फिरताना दिसतात. बहुरूपींना माहिती असते की, शेतकरी दिवाळीनंतर पिकांची कापणी करतो. भाताची मळणी करून (भात झोडून) पीक घरात आणण्याच्या तयारीत असतात. खळ्यामध्ये धान्याची रास पडलेली असते. बळीराजा सुखी, आनंदी असतो. याचाच फायदा
घेत ते खळ्यावर पोहचतात आणि पोटधरून हसवून बिदागी मिळवतात. शेतकरीही आनंदाने त्यांना धान्य देतो. त्यामुळे दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये बहुरूपीचे ग्रामीण भागात दर्शन होते.
ग्रामीण भागाचे झपाट्याने नागरीकरण झाल्याने पूर्वीप्रमाणे गावातील चालीरीतीमध्ये बदल होत आहे. याचा फटका बहुरूपींना बसत आहे. सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागात खूप मान-पान होता. कमाईपण होत होती; मात्र आता गावांचा चेहरा-मोहराच बदलला आहे. घराजवळ गेल्यावर लोक दरवाजा बंद करून घेतात, याचे वाईट वाटते.
- हरिभाऊ शिंदे, बहुरूपी
विनोदी शब्दांची फेकाफेक
हौसाबाई, नवसाबाई, गंगुबाई, धोंडूबाई, शिरट्या, धोंड्या, पांड्या, तुम्ही लग्नाला चला, पाटा वरवंटा घ्या डोकीला; पण तुम्ही लग्नाला चला, ढेकणांची उसळ, पिसवांची मिसळ, तू धाल बाई कसळ आणि पंगतीला बसा; पण तुम्ही लग्नाला चला, अशी शब्दांची फेकाफेक करून विनोद निर्माण करणारी बहुरुपी जमात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.