राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा
फक्त ४३,०६२ युनिट शिल्लक, रक्त संक्रमण परिषदेचे कडक निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : दिवाळी आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. सध्या राज्यभरातील रक्तपेढ्या आणि केंद्रांमध्ये केवळ ४३,०६२ युनिट साठा शिल्लक आहे. असे असतानाही काही केंद्रे मोठ्या प्रमाणात रक्त दुसऱ्या राज्यात पाठवत आहेत. तक्रार आल्यानंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेने आता कठोर कारवाई करत परिस्थिती सामान्य होईपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्त हस्तांतरणावर बंदी घातली आहे.
विशेष म्हणजे दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये बहुतेक लोक आपल्या संपूर्ण कुटुंबासह मूळगावी किंवा सहलीसाठी बाहेर पडतात. त्यात रक्तदात्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अशीच परिस्थिती या दिवाळीतही पाहायला मिळाली, मात्र विधानसभा निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि दाते व्यस्त असल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
रुग्णांना रक्तासाठी दारोदारी भटकावे लागत असल्याची परिस्थिती आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व रक्तपेढ्या आणि केंद्रांमध्ये एकूण ४३,०६२ युनिट रक्त शिल्लक आहे. रक्त मिळत नसल्याचे फोन एसबीटीसीलाही रुग्णांकडून येत आहेत. दिवाळीच्या सुट्या आणि विधानसभा निवडणुकीमुळे ऐच्छिक रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. एसबीटीसी वेबसाइटच्या दैनंदिन साठ्याच्या माहितीनुसार रक्तसाठा संपुष्टात आला आहे.
एसबीटीसीने म्हटले आहे की, काही रक्त केंद्रे मोठ्या प्रमाणात रक्त इतर राज्यांमध्ये पाठवत आहेत. यासंदर्भात, रक्त केंद्राने इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तांतरण करण्यापूर्वी राज्यातील रक्त आणि घटकांच्या गरजेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच ३१ जानेवारी २०२५ पर्यंत किंवा राज्यात परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
ऐच्छिक रक्तदान शिबिरावर भर
एसबीटीसीने स्वयंसेवी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी आणि नियमित रक्तदात्यांकडून रक्तदान वाढवण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक संस्थांशी संपर्क साधून प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी गृहनिर्माण संस्था संकुलातही शिबिरे आयोजित करावीत.
महाराष्ट्रातील रक्त युनिटचा साठा-
ए पॉझिटिव्ह - २.६ हजार युनिट
ए निगेटिव्ह - २३० युनिट
बी पॉझिटिव्ह - ३.३ हजार युनिट
बी निगेटिव्ह - २५९ युनिट
एबी पॉझिटिव्ह – १.२ हजार
एबी निगेटिव्ह - ९८ यनिट
ओ पॉझिटिव्ह - ३.७५ हजार
ओ निगेटिव्ह - २६१
आरडीपी - १.६२ हजार
सीडीपी - ४४
मुंबईतील रक्ताची स्थिती
ए पॉझिटिव्ह - ४८९ युनिट
ए निगेटिव्ह - ३१ युनिट
बी पॉझिटिव्ह - ४९२
बी निगेटिव्ह - २८
एबी पॉझिटिव्ह - १७२ हजार
एबी निगेटिव्ह - १७ युनिट
ओ पॉझिटिव्ह - ५२० हजार
ओ निगेटिव्ह - ४८
आरडीपी - १४९
सीडीपी - १२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.