सहा मतदारसंघांत उमेदवारांची ‘गर्दी’
मतदानासाठी दोन बॅलेट युनिट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतून एकूण २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत; मात्र यातील कल्याण पश्चिम, अंबरनाथ (अ.जा.), उल्हासनगर, कल्याण पूर्व, मिरा-भाईंदर आणि ऐरोली विधानसभा या सहा मतदारसंघांत सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी दोन बॅलेट युनिट असणार आहेत.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर विरुद्ध ठाकरे गटाचे सचिन बासरे, असा थेट सामना होणार आहे. या ठिकाणी वरुण पाटील या बंडखोर अपक्षाने माघार घेतली आहे; मात्र तरीही त्यांच्या नावासह २४ उमेदवारांची यादी बॅलेट युनिटवर लागणार आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातही हीच स्थिती आहे. या ठिकाणी भाजपने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे धनंजय बोडारे आणि शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर महेश गायकवाड अशी तिरंगी लढत आहे; मात्र येथेही अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे येथे एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
उल्हासनगरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओमी कलानी, असा सामना रंगणार आहे. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात अपक्ष रिंगणात उतरले असल्याने उमेदवारांची संख्या १९ झाली आहे. मिरा-भाईंदरमध्ये विद्यमान आमदार गीता जैन विरुद्ध भाजप उमेदवार नरेंद्र मेहता आणि काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन, अशी तिरंगी लढत आहे. याशिवाय छोट्या-मोठ्या पक्षासह येथे उमेदवारांची संख्या १७ इतकी झाली आहे.
बंडखोरांमुळे डोकेदुखी
अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजेश वानखेडे असा सामना आहे. येथेही बंडखोरीची डोकेदुखी असून २२ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघातही भाजपचे विद्यमान आमदार गणेश नाईक विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे एम. के. मढवी, असा थेट सामना आहे, पण शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर विजय चौघुले यांच्यासह एकूण उमेदवारांची संख्या १७ इतकी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.