विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः मुंबईतील ३६ विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या ४२० उमेदवारांच्या भविष्याचा फैसला आज होणार आहे. लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळसरळ लढत बहुतांश मतदारसंघामध्ये आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने ही लढत त्रिकोणी करण्याचा प्रयत्न केला असला तरी निवडणुकीतून मविआ आणि महायुतीच्या भवितव्याचा निर्णय एक कोटींपेक्षा जास्त मतदार घेणार आहेत.
--------------------------------------------
उद्धव ठाकरे
अध्यक्ष - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मुंबईतील लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दमदार कामगिरी केली. लोकसभेच्या सहा जागांपैकी तीन जागा जिंकल्या, तर एक जागा केवळ ४८ मतांनी गमावली. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षातील बहुतांश आमदार, नेते फुटले. मात्र, मुंबईतील शिवसेनेचा कॅडर मात्र ठाकरेंकडे बऱ्यापैकी कायम राहिला. मुंबईत सहा आमदार, एक खासदार शिंदे गटात गेले. एवढ्या पडझडीनंतर उद्धव ठाकरे यांनी लोकसभेत मुंबईत दमदार कामगिरी केली. यावेळी महाविकास आघाडीकडून मुंबईतील एकूण ३६ जागांपैकी सर्वाधिक म्हणजे २२ जागा ठाकरे गट लढवत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मुंबई महापालिकेचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबईत शिवसेनेचा दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न ठाकरे यांचा आहे. मुंबईत जवळपास ११ मतदारसंघांत दोन्ही शिवसेना आमने-सामने आहे. या लढती जिंकल्यास मुंबईत शिवसेना केवळ ठाकरेंची असल्याचा संदेश देता येईल.
आव्हान
१. मनसे उमेदवारामुळे मराठी मतातील फाटाफूट टाळणे.
२. शिंदेंच्या उमेदवारांचा निर्णायक पराभव.
३. मुंबईत ठाकरेंचा दबदबा कायम ठेवणे.
-----------------------------------------
राज ठाकरे
अध्यक्ष-मनसे
लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या राज ठाकरे यांनी राज्यभरात १२५ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. मुंबई, ठाण्यासह काही भागात मनसेचा प्रभाव टिकून आहे. मुंबईत मनसेने २५ जागांवर उमेदवार दिले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यानंतर ठाकरे घराण्यातील अमित ठाकरे यांच्या रूपात दुसरा व्यक्ती थेट निवडणुकीच्या मैदानात उभा राहिला आहे. त्यामुळे माहीममधून अमित ठाकरे यांना विजयी करण्याचे सर्वांत मोठे आव्हान राज ठाकरे यांच्याकडे आहे. या मतदारसंघात राज ठाकरे यांच्या प्रयत्नानंतर शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी माघार घेतली नसल्याने एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. मुंबईत वांद्रे (पूर्व), वरळी, माहीम, शिवडी, भांडुप (पश्चिम) या मतदारसंघात मनसेचे उमेदवार लढतीत आले आहेत. यातील एक दोन जागा जिंकल्या तरी मनसेला नवी उभारी मिळेल. तसेच पक्षाचा प्रभाव कायम असल्याचा संदेश मतदारांमध्ये जाईल.
आव्हान
१. अमित ठाकरेंना विजयी करणे.
२. मुंबईत एक दोन जागा जिंकून पक्षाचे अस्तित्व दाखवून देणे.
३. पराभव झाल्यास पक्षापुढे अस्तित्वाचे संकट.
---------------------------------------
भाजप
मुंबईतील १७ जागा भाजप लढवत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुंबईत १६ जिंकल्या होत्या. मात्र, त्यावेळी शिवसेना एकसंध होती. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन भाजप निवडणुका लढवत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत भाजपने एक जागा जिंकली. अनेक मतदारसंघात महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. लोकसभेत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याची हीच संधी भाजपकडे आहे. गुजराती, हिंदी भाषिक मतदारांवर प्रभाव, मुंबईत अटल सेतू, मेट्रोसह विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प आकाराला आल्यामुळे मुंबईत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास भाजप नेतृत्वाला आहे. मात्र, शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भाजपमध्ये बंडखोरी झाली. माजी खासदार गोपाळ शेट्टी, प्रकाश मेहता, अतुल शहा सारख्या ज्येष्ठ नेत्यांची पक्षाने कशीबशी समजूत काढली. मात्र, नाराजी कायम आहे. मुंबई पालिकेवर झेंडा फडकवायचा असेल, तर विधानसभेत भाजपला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
आव्हान
१. ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करणे.
२. शिवसेना पक्ष फोडण्याचा आरोप पुसून काढणे.
--------------------------------------
एकनाथ शिंदे
मुख्य नेते - शिवसेना
शिवसेना फुटल्यानंतर लोकसभा निवडणुका ही जनतेतील पहिली परीक्षा होती. मात्र, मतदारांनी अस्सल शिवसेना कोणती? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दिले नाही. लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत सात जागा जिंकून एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. मुंबईत ४८ मतांनी का होईना पक्षाचे रवींद्र वायकर लोकसभेत गेले. यावेळी मुंबईत शिवसेना १६ जागा लढवत आहे. यातील निम्या म्हणजे ११ जागांवर दोन्ही शिवसेना उमेदवार आमने-सामने आहेत. दुसरीकडे मातोश्रीला सोडून शिंदेंची साथ देणाऱ्या आमदारांचा विजय एकनाथ शिंदेंसाठी महत्त्वाचा आहे. मुंबईत चांगली कामगिरी केल्यास आगामी काळात पक्ष बांधणीकडे लक्ष देता येईल. तसेच मुंबई पालिका निवडणुकीत पक्षाचे बऱ्यापैकी अस्तित्व राखता येईल.
आव्हान
१. मुंबईत पक्षाचे अस्तित्व जपणे.
२. मातोश्रीचा प्रभाव कमी करणे.
३. राजकीय कारकीर्द पणाला.
---------------------------------------------
काँग्रेस
एकेकाळी मुंबईत दबदबा असणाऱ्या काँग्रेस संघटना फाटाफुटीमुळे विखुरली गेली. मुस्लिम, दलित मतदार पक्षाकडे परतल्यामुळे लोकसभेत पक्षाला एक जागा जिंकता आली. शिवसेनेच्या भक्कम साथीमुळे मुंबईत लोकसभेप्रमाणे विधानसभेतही चांगली कामगिरी करता येईल, असा विश्वास काँग्रेसला आहे. यावेळी मुंबईत काँग्रेस पक्ष ११ जागा लढवत आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने २९ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी चार जागा जिंकल्या होत्या. यावेळी ८ ते १० जागा जिंकण्याचे नियोजन पक्षाचे आहे.
आव्हान
१. पक्षांतर्गत गटबाजी रोखणे.
२. पक्षसंघटना मजबूत करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.