मालेगावची कुख्यात टोळी जेरबंद
कारसह शस्त्र जप्त, पाठलाग करीत जवाहरनगर पोलिसांनी केली अटक
छत्रपती संभाजीनगर, ता. २४ ः निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीमध्ये मोबाईल लंपास करणाऱ्या मालेगावच्या सहा जणांच्या टोळीला जवाहरनगर पोलिसांनी जेरबंद केले. शुक्रवारी (ता. २३) दुपारी जालना रोडवर हा प्रकार घडला. या टोळीने कारमध्ये पलायन केले असता हर्सुल टि पॉइंट येथे पाठलाग करून पकडण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून धारदार शस्त्रे आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
जालना रोडवरील सेंट फ्रांसेस हायस्कूल येथे विधानसभा पूर्व मतदारसंघाची मतमोजणी सुरू होती. या ठिकाणी काही नागरिकांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती पोलिस अंमलदार मारोती गोरे आणि ज्ञानेश्वर शेलार यांना मिळाली होती. या माहितीवरून गोरे आणि शेलार यांनी संशयित आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांना पाहून एका तरुणाने पलायन केले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता हा संशयित एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसला. यानंतर कारचालकाने सिडको बस स्टँडच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनीदेखील त्यांचा पाठलाग सुरू केला. सिडको बस स्टँड मार्गे ही कार हर्सुल टि पॉइंटच्या दिशेने गेली. पोलिसांनी पाठलाग करीत हर्सुल टि पॉइंट येथे कारला अडवण्यात यश मिळवले. कारमध्ये एकूण सहा संशयित आढळून आले. कारची झडती घेतली असता आतमध्ये आठ मोबाईल, कुकरी, चाकू आणि फायटर आढळले. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले. कारमधील संशयित आरोपी मोहम्मद सैझाद शेख रोप (वय २०, रा. मेहबूबनगर मालदा फाटा, ता. मालेगाव जि. नाशिक), शेख इमरान शेख अजीज, (वय ३२, रा. गुलशेर नगर गल्ली नंबर ०३, मालेगाव जि. नाशिक), उमर फारूक शेख रफिक (वय २२, रा. मालदा शिवार ता. मालेगाव जि. नाशिक), शेख लतीफ शेख अतीक (वय ३१, रा. गुलशन इब्राहिम, गल्ली नं ०१, मालेगाव जि. नाशिक), मोहम्मद मोसिन अब्दुल हमीद शेख (वय ३६, रा. मुंसी साबानगर, गरीब नवाज चौक, गल्ली नं-०२, मालेगाव जि.नाशिक) आणि अरबाज शेख फिरोज शेख (वय ३१, रा. मदिनी नगर गल्ली नं ०१, मालेगाव जि. नाशिक) यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपआयुक्त नवनीत कॉवत, सहाय्यक पोलिस आयुक्त रंजीत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उमाजी शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मारोती खिल्लारे, शिगाने, चंद्रकांत पोटे, मारोती गोरे, श्रीकांत काळे, बाळासाहेब बैरागी, ज्ञानेश्वर शेलार, राम रावते यांनी केली.
........
रेकॉर्डवरील गुन्हेगार
या आरोपींवर मालेगाव शहरात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊन ऐवज लंपास करण्याची या गुन्हेगारांची पद्धत आहे. शहरातदेखील ही टोळी गुन्हे करण्यासाठी आली होती. त्यांनी एका नागरिकाचा मोबाईलदेखील लांबवला होता, मात्र इतर गुन्हे करण्यापूर्वीच जवाहरनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही टोळी जेरबंद झाली.
.............
फोटो - मालेगावची गुन्हेगाराची टोळी आणि जप्त ऐवज ABD24J28560
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.