लाडक्या बहिणींच्या लाभासाठी आता निकषांवर बोट!
चारचाकी, कुटुंबातील कितींनी अर्ज भरल्याची पडताळणीच नाही; एप्रिलपासून दरमहा २,१०० रुपये
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २९ : विधानसभेपूर्वी राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. त्यातील दोन कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभदेखील मिळाला. आता नूतन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा २,१०० रुपये देणार आहे. तत्पूर्वी, योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर १ एप्रिलपासून दरमहा दीड हजाराऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली. जुलै ते सप्टेंबरपर्यंत राज्यातील अडीच कोटींपर्यंत लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त झाले. योजनेच्या लाभासाठी कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांचे असावे, लाभार्थीच्या कुटुंबातील कोणी आयकर भरणारा नसावा, एका शासकीय योजनेचा तेवढ्याच रकमेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र असतील, असे निकष घालण्यात आले होते; मात्र या निकषांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही. त्यामुळे प्रत्येक अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्र घेतले आणि त्या सर्वच २१ ते ६५ वयोगटातील अर्जदार लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला. त्यासाठी एका वर्षासाठी ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. योजनांच्या निकषांची काटेकोर पडताळणी झाल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी होऊ शकतात आणि तेवढ्याच निधीतून पात्र लाडक्या बहिणींना दरमहा २,१०० रुपये देणे शक्य होईल, असे राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांचे मत आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यावर योजनेच्या अधिक रकमेसाठी किती रक्कम तिजोरीतून आगाऊ जाऊ शकते, निकषांची पडताळणी झाल्यास किती लाभार्थी कमी होतील, यावर अभ्यास होईल, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
----------
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम वाढेल; पण त्यासाठी शासन निर्णय अपेक्षित आहे. सध्याच्या लाभार्थींमधील आयकर भरणारे कोण आहेत, कुटुंबाकडे चारचाकी आहे का, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिकांनी अर्ज केले आहेत का, याची पडताळणी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे.
- प्रसाद मिरकले, महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
--------------
‘या’ निकषांची होणार पडताळणी...
- योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का?
- लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?
- एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का?
- परितक्त्या, विधवा महिला निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.