सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता.२९ ः ऑनलाइन मटक्यातून दोन कोटी रुपये कमावल्याचे सांगून दोन तोतया पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ७४ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
डोंबिवलीजवळील पलावा गृहसंकुलात राहणारे सेवानिवृत्त गृहस्थ परदेशातील एका नामांकित कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबई पोलिस दलात अधिकारी असल्याचे भासवत एका व्यक्तीने फोन केला. तुमच्या नावाने नवीन सीमकार्ड घेतले गेले आहे, तसेच तुमच्या आधारकार्डचा वापर करून गैरव्यवहार झाल्याचे सांगताना ऑनलाइन मटक्याच्या माध्यमातून दोन कोटी कमावल्याचे सांगण्यात आले, तर दुसऱ्या तोतया अधिकाऱ्याने फोन करून त्यांना धमकावले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची नोटीस पाठवण्यात आली असून तुम्हाला अटक करण्याचे आदेश आहेत, तसेच निर्दोषत्व सिद्ध होण्यासाठी बँक खात्यातील रक्कम तपासासाठी वळती करावी, असे सांगितले. या प्रकाराने गोंधळलेल्या ज्येष्ठ नागरिकाने ७४ लाखांची रक्कम तोतया पोलिसांनी दिलेल्या खात्यावर वळती केली, पण मित्राशी बोलल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला. यानंतर तातडीने सायबर गुन्हे विभाग आणि मानपाडा पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------------------------
कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फोनवर किंवा आर्थिक व्यवहारांवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी तत्काळ नागरिकांशी संपर्कात राहावे.
- विजय कादबाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मानपाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.