उरण, ता. ३ (बातमीदार) : मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी पूजन उत्सवानिमित्त शहरातील भाजी आणि फूल बाजार गर्दीने फुलला आहे. व्रताच्या आगमनामुळे भाज्या आणि फुलांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. गुरुवारी (ता. ५) पहिले महालक्ष्मी पूजन असल्यामुळे मंगळवारी उरण बाजारातील भाजी बाजारासह फूल बाजारात सकाळपासूनच महिलांची खरेदीसाठी गर्दी होती.
आधीच जीवनाश्यक वस्तू महाग असताना आता सणासुदीच्या दिवसात भाजी आणि फूल बाजारावरही त्याचा परिणाम झाला आहे. शेवटच्या गुरुवारी फुले दुपटीने महाग होण्याची शक्यताही व्यापारीवर्गातून वर्तविण्यात आली. मार्गशीर्ष महिना सुरू असल्याने उरणमधील बऱ्याच कुटुंबांत शाकाहार केला जात असल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या भावावरही झाला आहे. गेल्या काही दिवसांत भाज्यांचे भाव ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे असून बहुतेक फळभाज्यांमध्ये १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. पालेभाज्या मात्र स्थिर किमतीत मिळत आहेत. मेथी व पालक २० रुपये जुडीप्रमाणे आहे. टोमॅटो, कोबी, कोथिंबीर, मिरची या रोजच्या जेवणात आढळणाऱ्या भाज्यांचे भाव रोजच्यापेक्षा १० ते २० रुपयांनी वाढले आहेत, तसेच फुलांचा बाजार विविध आकर्षक फुलांसोबत लोकांच्या गर्दीने फुलला आहे. महालक्ष्मी व्रताच्या निमित्ताने फुलांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्यामुळे बाजारात फुलांना चांगलीच मागणी होती. महालक्ष्मीसाठी हारांचा सेट १५० रुपयाला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असलेली शेवंतीची फुले यावर्षी बाजारात कमी आली आहेत. त्यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा भावसुद्धा दुप्पट झाले आहेत.
-----------------
शेवंतीच्या फुलांचा मान
महालक्ष्मीच्या हारासाठी शेवंतीच्या फुलांचा उपयोग जास्त होतो. त्यामुळे या फुलांना जास्त मागणी आहे. यावर्षी पांढरी शेवंती बाजारात कमी आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पांढरी शेवंती २०० रुपये किलो, पिवळा झेंडू २५०, गुलाब ४००, निशिगंधा ४४० रुपये किलोप्रमाणे विक्री केला जात आहे. गुलाब, अष्टर व गुलछडीचीही आवक जेमतेमच आहे. अष्टर, जरबेरा या फुलांची अनुक्रमे १०० ते १५० व २०० ते २५० रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू आहे. गुरुवारी या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. टोरो गुलाबाची २५ फुले ४०० रुपयांना विकली जात आहेत. विशेष म्हणजे महालक्ष्मी पूजेसाठी लागणारी कमळाची फुले १० ते १५ रुपयाला एक फूल असे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
---------------
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमुळे हार, फुले, गजरे, वेणी यांना मोठी मागणी मिळते. उरणचे गजरे सगळ्यात वेगळे आणि सुंदर असल्याने येथे फॅन्सी गजरे व वेणी घेण्यासाठी कित्येक लोक बाहेरूनदेखील येत आहेत.
- सुलभा केणी, फुलविक्रेती, उरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.