पेण तहसीलसह पोलिस ठाण्यात वाहनांची गर्दी
गाडी काढण्यासाठी अधिकाऱ्यांची तारांबळ
पेण, ता. १० (वार्ताहर) : तहसील कार्यालयासह पेणमधील पोलिस ठाण्याच्या आवारात खासगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. अनेकदा येथील अधिकाऱ्यांची स्वतःची गाडी काढताना तारांबळ उडते. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहनांमुळे येथील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
तहसील कार्यालयासह पोलिस ठाणे, वनविभाग, दुय्यम निबंधक, भूमिअभिलेख, ट्रेझरी कार्यालयासह विविध कामांसह दाखल्यांसाठी लागणाऱ्या स्टॅम वेंडरची कार्यालये याच परिसरात आहेत. तालुक्यातील हजारो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध खासगी कामांसाठी येथे रोज वाहनांची ये-जा असते; मात्र या आवारात आलेली चारचाकी तसेच दुचाकी वाहने कशाही पद्धतीने उभी करण्यात येत असल्याने वाहनांची कोंडी होते. आपत्काळात अधिकारी वा कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर जायचे असल्यास, वाहन काढताना अडचणीचे होते. तहसील आवारातील वाहनांची कोंडी कमी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पेण तहसील आणि पोलिस ठाण्याच्या आवारात सातत्याने चारचाकी, दुचाकी वाहने लागलेली असतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील अनेक नागरिक कामानिमित्त येत असल्याने त्यांनाही या कोंडीचा फटका बसतो. आपत्काळात वाहन
काढताना चालकाची दमछाक होते, त्यामुळे नागरिकांनी आपली वाहने खालीच पार्क करावीत, अन्यथा अशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल.
- तानाजी शेजाळ, तहसीलदार, पेण
---------
बोर्लीपंचतनमधील वाहतूक कोंडीवर उपाय
दिघी सागरी पोलिसांनी समन्वयातून दिल्या व्यापाऱ्यांना सूचना
श्रीवर्धन, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराच्या मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवायची. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता; मात्र आता दिघी सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहापोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे यांच्या समन्वयाने ही कोंडी फुटणार आहे.
वाहतूक कोंडीबाबत प्रभारी अधिकारी शिंदे यांनी, बोर्ली शहरातील सर्वच व्यापाऱ्यांबरोबरच नुकतीच बैठक घेतली. या वेळी मालवाहतुकीचे ट्रक कुठल्याही ठिकाणी उभे करण्यावरून नाराजी व्यक्त केली. दिवेआगर तसेच दिघी, श्रीवर्धनकडे जाण्यासाठी बोर्लीपंचतन हाच मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. याशिवाय स्थानिकांनाही या मालवाहतुकीचा त्रास होतो.
सध्या पर्यटन हंगाम सुरू असून आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थही खरेदीसाठी बोर्लीला येतात. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी येथूनच मार्गक्रमण करतात. वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे पर्यटक तसेच स्थानिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केल्याने परिसरातील कोंडी फुटेल, असा विश्वास स्थानिकांना आहे.
सुचवलेल्या उपाययोजना
व्यापाऱ्यांनी दुपारच्या वेळी माल उतरावावा.
अवजड वाहने रस्त्यालगत उभी करू नये.
वीकेण्डला माल ट्रक बोलावू नये.
गर्दीच्या वेळी मालवाहतूक थांबवण्यात यावी.
श्रीवर्धनमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले असून त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. माल उतरताना ठरलेल्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक व्यापाऱ्यांकडून पोलिस प्रशासनाला व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य मिळेल.
- मनुभाई कोठारी, अध्यक्ष, व्यापारी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.