सशक्त पिढी घडवण्याची जबाबदारी आपली : अमित शेटे
ठाणे शहर, ता. ७ (बातमीदार) : एका सर्व्हेनुसार पुढील चार-पाच वर्षांत भारत हा जगातील सर्वात जास्त बालकांची संख्या असलेला देश होणार आहे; पण त्याचवेळी दुसरीकडे महिला व बालविकास विभागाने केलेल्या सर्व्हेत ५३ टक्के बाल लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झाल्याचे उघड झाले आहे. तर, दाखल न झालेल्या गुन्ह्यांची संख्याही फार मोठी असू शकते. त्यामुळे उद्याची ही पिढी सुदृढ, सशक्त आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम करायची असेल तर ती जबाबदारी आपल्यावर आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश दोन अमित एम. शेटे यांनी केले. ठाणे-पालघर जिल्ह्यासाठी बाल अधिकारांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बालकांच्या अधिकारांच्या संरक्षणार्थ ५४ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीशासह २० वकिलांचा समावेश असलेली ही समिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायदीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या आदेशाने आणि ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. या समितीला बालकांच्या अधिकारांची माहिती व्हावी, यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दोनदिवसीय कार्यशाळा ५ व ६ डिसेंबरला आयोजित केली आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळी साडेदहा वाजता कौटुंबिक न्यायालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी मान्यवरांनी उपस्थित समिती सदस्यांना मार्गदर्शन केले.
न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी स्थापन केलेल्या ‘चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिस फॉर चिल्ड्रेन स्कीम २०२४’ समितीची माहिती आणि महत्त्व सांगून सर्व सदस्यांना बालहक्कासाठी चांगले काम करण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी राणी बैसाणे (अध्यक्ष- बालकल्याण समिती ठाणे), डॉ. राहुल वाणी (महिला व बालविकारतज्ज्ञ), संजय बागुल (जिल्हा महिला व बालविकास अधिकारी), महेंद्र गायकवाड (मा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी), रामकृष्ण रेड्डी (ठाणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी), प्राजक्ता कनोजे (मिरॅकल फाउंडेशन समन्वयक), वकील शिल्पा नेलवडकर (बाल न्याय मंडळ सदस्य) रमा व्ही. सावंत-वाघोले (मा. जिल्हा न्यायाधीश), पल्लवी जाधव (संस्थात्मक बाल संरक्षण अधिकारी), तेजस्विनी पाटील (सखी वन स्टॉप सेंटर केंद्र प्रशासक), उषा बाबर (पोलिस निरीक्षक) आणि ठाणे, कल्याण, बेलापूर, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर, मुरबाड, जव्हार, वाडा, डहाणू, वसई, पालघर या तालुक्यातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यशाळेत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा पोक्सो, बाल हक्क संरक्षण कायदा, बालकल्याण कायदे, बालकामगार कायदा, बालहक्क संरक्षण आयोग, बाल न्याय कायदा, पी.सी.पी.एन.डी.टी. कायदा, महिला व बालविकास विभागाची भूमिका, दत्तक प्रक्रिया, बालगृहे, अनाथाश्रम, वन स्टॉप सेंटर अशा बालकांसंबंधी विविध कायद्यांची माहिती व प्रशिक्षण दिले. तळागाळातल्या, वाडी-वस्तीतील लोकांसाठी काम करताना या समितीला या कायद्याची जनजागृती करण्यासाठी उपयोग होणार आहे, असा विश्वास कार्यशाळेचे आयोजक जिल्हा विदेशी सेवा प्राधिकरणाचे न्या. ईश्वर सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.