जव्हार, ता. ७ (बातमीदार) : थंड हवेचे ठिकाण असलेल्या जव्हार तालुक्यात सध्या सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखीसारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या सगळ्यांत न्युमोनिया हा आजार अधिक धोकादायक ठरत असल्याचे विक्रमगड येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रशांत राजगुरू यांनी सांगितले. अशी लक्षणे असणारे रुग्ण १५ दिवसांपासून तक्रार घेऊन जव्हार रुग्णालयात येत आहेत.
विषाणू, जिवाणू किंवा बुरशी संसर्गामुळे फुफ्फुसांमध्ये जो संसर्ग होतो त्याला ‘न्यूमोनिया’ असे म्हणतात. बऱ्याचदा त्याच्या लक्षणांना एक किरकोळ आजार किंवा सामान्य सर्दी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते; परंतु न्यूमोनिया हा लहान मुलांमध्ये सामान्य आहे. त्यापासून मृत्यू ओढवला जाण्याची भीती असते. कोरोनाकाळात यामुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे न्युमोनियाकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन तज्ज्ञ करतात.
न्यूमोनियाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १२ नोव्हेंबर हा जागतिक न्यूमोनिया दिन म्हणून पाळला जातो. साधारण गत पंधरवड्यात याबाबत विविध कार्यक्रम घेण्यात आले. एवढे करूनही समाजात जागृती नाही. यामध्ये फुफ्फुसातील पेशींना सूज येते. फुफ्फुसात हवेच्या अत्यंत छोट्या-छोट्या पिशव्यांमध्ये जंतू संसर्ग झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. श्वास घेताना त्रास होऊ शकतो. हा केवळ जिवाणूंमुळेच नव्हे, तर विषाणू किंवा बुरशी संसर्गामुळेही होऊ शकतो.
सर्वच प्रकारचे न्यूमोनिया गंभीर नसतात. काही रुग्ण घरच्या घरी लवकर बरे होऊ शकतात. तो होण्यास कारणीभूत असलेले विषाणू खोकला, शिंकणे आणि आजारी लोकांच्या संपर्कातून पसरू शकतात. हे मुख्यतः रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. सर्वात सामान्य जिवाणू जे न्यूमोनियासाठी ओळखले जातात ते म्हणजे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. परंतु हे कोरोनासारख्या विषाणूंमुळेही होऊ शकतात.
न्यूमोनियाची लक्षणे
ताप, थकवा येणे, थंडी वाजणे, दम लागणे, छातीत दुखणे, खोकला, शिंका येणे, छातीत घरघर होणे, श्वास घेण्यास त्रास होणे.
श्वसनविकाराच्या संसर्गात न्यूमोनियाचा अधिक धोका आहे. हा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक, लहान मुले आणि वयोवृद्धांना सावध राहणे गरजेचे आहे. हाताच्या स्वच्छतेचे पालन करणे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जिवाणूविरोधी औषधे, संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. दुर्लक्ष केल्यास ते जीवावर बेतू शकते.
- डॉ. प्रशांत राजगुरू, वैद्यकीय अधिकारी, विक्रमगड ग्रामीण रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.