ठाण्यात झाडांचा बळी
इंजेक्शन देऊन दोन वृक्ष जाळण्याचा प्रकार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि महापलिकेच्या माध्यमातून निसर्गाचे संवर्धन व्हावे, यासाठी झाडे लावा, झाडे वाचवा असा संदेश देण्यात येतो; मात्र दुसरीकडे काही अज्ञात झाडांना इंजेक्शन देऊन त्यांचा बळी घेत आहेत. असाच प्रकार ठाण्यातील नौपाडा गोखले रोड परिसरात समोर आला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन झाडांना इंजेक्शन देत असल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे; मात्र या घटनेची माहितीच पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला नसल्याचे दिसून येत आहे.
ठाणे महापलिकेच्या व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ठाणे शहरातील विविध भागांत पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण सोहळा करण्यात येत असतो; मात्र दुसरीकडे पालिकेच्याच वृक्ष प्राधिकरण विभागाकडे त्यातील किती वृक्ष जगतात, किती मरतात, याची आकडेवारी नसल्याचे दिसून येते. यापूर्वी ठाणे शहरातील विविध भागांत अशाच पद्धतीने वृक्षांना औषध टाकून मारल्याचा प्रकार समोर आला होता. त्यात आता गोखले रोड परिसरातील एका हॉटेलसमोर असलेल्या दोन वृक्षांना २९ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात व्यक्तीने इंजेक्शन देऊन जाळण्याचा प्रयत्न केला. या भागात दोन वृक्ष होते. त्यातील एक वृक्ष यापूर्वी अज्ञाताने अर्धा तोडला होता; परंतु तो पुन्हा वाढू लागला होता. त्यामुळे तो वृक्षदेखील अज्ञात व्यक्तीने इंजेक्शन देऊन जाळल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आले आहे.
दुकानदारांनीदेखील याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. आता येथील वृक्ष कोणी मारले, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. यासंदर्भात येथील रहिवासी पप्पू गवस यांनी हे फुटेज समोर आणले असून, या प्रकाराची चौकशी करून कारवाई व्हावी; अशी मागणी केली आहे. वृक्ष प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी याची पाहणी करून नौपाडा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.