श्रीवर्धन, ता. ११ (वार्ताहर) ः श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालय व जसवलीतील ग्रामीण रुग्णालयातील १०२ क्रमांकाच्या दोन्ही रुग्णवाहिकांची सध्या दुरवस्था झाली आहे, तसेच टायर्स झिजले आहेत. तशाच स्थितीत गर्भवती व इतर रुग्णांना सेवा देत असल्याने अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात दोन रुग्णवाहिकांसाठी एकच चालक असल्याने एकावेळी एकाच रुग्णवाहिकेचा उपयोग होतो, तर कार्डियाक रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर रुग्णास पुढील उपचारासाठी शहरात न्यायचे असल्यास खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागत असून, मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरित उपचार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून राज्यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. गर्भवती, ज्येष्ठ नागरिक, तसेच गंभीर आजारी रुग्णांना याचा लाभ होत असून १०२ क्रमांकावर संपर्क केल्यास वातानुकूलित, ऑक्सिजन सिलिंडरसह रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध होते.
श्रीवर्धन तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय, जसवली येथे प्रत्येकी एक अशी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका देण्यात आली आहे. श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक असल्याने जसवली येथील ग्रामीण रुग्णालयाची १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका ही श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी वापरली जाते.
सध्याच्या परिस्थितीत दोन्ही रुग्णवाहिकांचे टायर्स झिजले आहेत. त्यामुळे रुग्णांची वाहतूक होताना अपघाताचा धोका बळावला आहे. कोविड काळात आमदार आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी कार्डियाक रुग्णवाहिका दिली होती, परंतु ती सध्या नादुरुस्त असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना खासगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागतो आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावे डोंगराळ, दुर्गम भागात असून अनेक ठिकाणी रस्तेही नाहीत. गर्भवती, ज्येष्ठ नागरिक अथवा गंभीर रुग्णांना नेताना रुग्णवाहिकेचा टायर फुटून अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
रुग्णवाहिकांसाठी नवीन टायर्सची प्रक्रिया पुणे परिवहन विभागाच्या उपसंचालकांकडून केली जाते. टायर्सची मागणी दोन महिन्यांपूर्वीच केली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १५ ते २० दिवसांत दोन्ही रुग्णवाहिकांना नवीन टायर्स उपलब्ध होतील. आचारसंहितेमुळे प्रक्रिया लांबली होती. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयासाठी लवकर १०८ नंबरची रुग्णवाहिका उपलब्ध होईल. वायरिंग प्रॉब्लेम झाल्याने कार्डियाक रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठवली आहे. रायगड जिल्ह्यातील रुग्णालयांकरिता १८ चालकांची मागणी केली आहे व त्याकरिता प्रस्ताव पाठविला आहे.
- डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग
.........................
सात महिन्यांपासून खालापूर आरोग्य केंद्र रुग्णवाहिकेविना
अपघातानंतर दुरुस्तीला विलंब
खालापूर, ता. ११ (वार्ताहर) ः सात महिन्यांपूर्वी अपघातग्रस्त झालेली खालापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. १४ मे २०२४ रोजी एका गर्भवतीला जिल्हा रुग्णालयात सोडण्यासाठी खालापूरवरून पाठवली होती. येथील परतत असताना, वडखळ येथे गुरे आडवी आल्याने त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात रुग्णवाहिका अपघातग्रस्त झाली. तेव्हापासून म्हणजे सात महिने झाले तरी रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध झालेली नाही.
खालापूर तालुक्यातील गरीब, गरजू कुटुंबासाठी प्राथमिक केंद्र वरदान ठरत असून, प्रसूतीसाठी अनेकजणी आरोग्य केंद्रात येतात. एखाद्या वेळी प्रसूतीदरम्यान जटिलता निर्माण झाल्यास तातडीने अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवावे लागते. खालापूर आरोग्य केंद्रात नेहमी अशा घटना घडतात. अशा वेळी रुग्णालयाची हक्काची रुग्णवाहिका असल्यास रुग्णाला तातडीने उपचारासाठी हलवणे सोपे जाते. खासगी रुग्णवाहिका भरमसाठ भाडे आकारतात. त्यामुळे सरकारी रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते. रुग्णवाहिका सात सात महिने दुरुस्ती होत नसेल, तर प्रशासनाच्या दृष्टीने दुदैवी बाब असल्याचे खालापूरमधील भाग्यश्री शिंदे यांनी सांगितले.
अपघातग्रस्त रुग्णवाहिकेची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. दुसरी रुग्णवाहिकेची बॅटरी असल्याने वारंवार बंद पडते. आरोग्य केंद्रासाठी लवकर उपलब्ध रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. अनिल कुमार शहा, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खालापूर
खालापूर ः प्राथमिक आरोग्य केंद्राची अपघातग्रस्त रुग्णवाहिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.