प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. ११ : पालघर जिल्ह्यात खासदार तर नव्याने निवडून आलेले महायुतीचे पाच आमदार अशी भाजपची राजकीय ताकद वाढली आहे. स्थानिक पातळीवर लोकनेतृत्वामध्ये परिवर्तन दिसून येत आहे. एकीकडे मोठमोठे विकास प्रकल्प आणि त्यातच मतदारांचा महायुतीकडे कौल पाहता आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
पालघर जिल्ह्यात काँग्रेसने वसई आणि नालासोपारा या दोन जागांवर विधानसभेसाठी उमेदवार दिले होते, मात्र त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाकडून विक्रमगडमध्ये उमेदवार देण्यात आला, परंतु त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. अजित पवार गटाने वेगळी चूल मांडल्यावर पालघर जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्यासोबत राहिले; परंतु जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही.
लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचारात जोर धरला होता. त्यामुळे डॉ. हेमंत सवरा यांचा विजय झाला. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका लागल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. महायुती, महाविकास आघाडीने पालघर जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभांत उमेदवार उभे केले आणि पक्षीय बलाबल कोणाचे याची लढत सुरू झाली. यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतून काँग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटाने प्रत्येकी दोन, तर शरदचंद्र पवार गट व सीपीएमने एका जागेवर उमेदवार उभा केला होता. यातील केवळ एक मतदारसंघ जिंकण्यात यश आले. भाजपला तीन तर शिवसेनेच्या शिंदे गटाने दोन जागा काबीज केल्या.
पालघर जिल्ह्यातील बदललेले राजकीय समीकरण पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि अजितदादा पवार गटाला संघटना बांधणीपासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका ते महानगरपालिका असा पल्ला गाठण्यासाठी राजकीय ताकद पणाला लावावी लागणार आहे.
महापालिकेसाठी कस लागणार
वसई विरार महापालिका ही पालघर जिल्ह्यातील एकमेव आहे. अडीच विधानसभा मतदारसंघांचा समावेश पालिका क्षेत्रात आहे. विधानसभेत महायुतीतील दोन भाजप तर एक शिंदे गटाने जागा जिंकली आहे. त्यामुळे त्यांचे पुढचे लक्ष्य हे महापालिका असणार आहे. काँग्रेसनेदेखील वसईतून चांगली मते मिळवली असल्याने ठाकरे गटासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे महापालिकेत उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली होऊ शकतात.
भाजपचा एल्गार
भाजपने महापालिका निवडणुकीत भगवा फडकणार, असा एल्गार केला आहे. त्यादृष्टीने पक्षबांधणी मजबूत केली जात आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आली आहे. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या तर वसई विरार महापालिकेसह अन्य निवडणुकांत ताकदीनिशी समोर येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.