धारावीतील मैदान बनले वाहनतळ
वाहने उभी केल्याने खेळाडूंची गैरसोय
धारावी, ता. ७ (बातमीदार) : धारावीतील राजर्षी शाहू नगर वसाहतीतील राजर्षी शाहू महाराज मैदान खेळण्यासाठी बनवण्यात आले आहे, मात्र मैदानात दुचाकी व चारचाकी वाहने बेकायदेशीरपणे उभी केली जात आहेत. त्यामुळे हे खेळाचे मैदान आहे की, वाहनतळ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अनधिकृत वाहनतळाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
वसाहतीतील लहान मुलांना खेळण्यासाठी व स्थानिकांना मनोरंजन व अन्य कार्यक्रमासाठी या मैदानाचा फायदा होतो, मात्र गेल्या काही दिवसांपासून मैदानात वाहने उभी करून ठेवली जात आहेत. धारावीतील अनेक विभागातील नागरिक या मैदानात वाहने उभी करून पुढील प्रवासासाठी निघून जातात. वाहने उभी करण्यासाठी मोफत जागा मिळत असल्याने दिवसेंदिवस मैदानात वाहनांची गर्दी वाढत चालली आहे.
राजर्षी शाहू नगर विकास समिती व स्थानिक रहिवाशांचा या बेकायदेशीर वाहनतळाला विरोध आहे. या अनधिकृत वाहनतळावर पालिकेने कारवाई करणे अपेक्षित आहे. वसाहतीतील रहिवाशांना वसाहतीत मुबलक मोकळी जागा असल्याने स्थानिक रहिवासी मैदानात वाहने उभी करत नाहीत.
सकाळपासून वाहने उभी करून ठेवली जातात. संध्याकाळी घरी जाताना वाहनधारक वाहने घेऊन जातात. अनेकदा रात्रभर किंवा अनेक दिवस काही वाहने तशीच उभी ठेवली जात आहेत. वाहतूक विभाग व पालिकेने या अनधिकृत पार्किंगवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वसाहतीच्या बाहेरील लोक माहीम स्थानकात जाण्यासाठी या ठिकाणी वाहने उभी करतात. अनेकदा दिवस-रात्र इथे वाहन उभे ठेवले जाते.
- विवेक कांबळे,
सदस्य, राजर्षी शाहू नगर विकास समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.