झोपेत दगडाने हल्ला करणाऱ्या वृद्धाला अटक
खार पोलिसांची कारवाई; दारूच्या नशेत केले कृत्य
अंधेरी, ता. ७ (बातमीदार) ः पदपथावर झोपलेल्या अरुण भगवत पाटील या ३६ वर्षांच्या व्यक्तीवर दगडाने प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या एका ७४ वर्षांच्या वयोवृद्धाला कुठलाही पुरावा नसताना खार पोलिसांच्या विशेष पथकाने दोन दिवसांपूर्वी अटक केली. धर्मा माया बसवंत असे या वयोवृद्धाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपीला वांद्रेतील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या हल्ल्यामागील कारण स्पष्ट झाले नाही, मात्र धर्मा बसवंत याने दारूच्या नशेत हा हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अरुण पाटील हा वांद्रे येथील लालमिठ्ठी ब्रिजवळील पदपथावर राहत असून, भंगार गोळा करण्याचे काम करतो. ३१ डिसेंबरला दुपारी १२ वाजता तो खार येथील रोड क्रमांक तीन, मनिष सायकल दुकानासमोरील पदपथावर झोपला होता. दुपारी पाऊणच्या सुमारास त्याच्या डोक्यात एका अज्ञात व्यक्तीने दगडाने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात नाकाला, डोक्याला, ओठाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या नाकाला फ्रॅक्चर झाले होते.
माहिती प्राप्त होताच खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अरुण पाटील याच्या जबाबानंतर खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता कोंकणे, तुषार काळे, सहाय्यक पोलिस फौजदार मनोज वैद्य, पोलिस हवालदार आनंद निकम, पोलिस शिपाई संजय सानप, अजित जाधव, मारुती गळवे, अभिजीत कदम यांनी धर्मा बसवंत याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली.
धर्मा हा मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, शांतीनगर झोपडपट्टीत राहतो. तो भंगार गोळा करण्याचे काम करतो. तो वांद्रे, खार आणि निर्मलनगर परिसरात नियमित भंगार गोळा करण्यासाठी येत होता. ३१ डिसेंबरला तो खार येथे आला होता. या वेळी त्याने मद्यप्राशन केले होते. दारूच्या नशेत असताना काहीही कारण नसताना त्याने झोपेत असलेल्या अरुण पाटील याच्यावर दगडाने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तो पळून गेला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये धर्मा हा पोलिसांना दिसून आला होता. त्याचा शोध घेत असताना त्याला निर्मलनगर येथील हनुमान मंदिर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.