पादचारी पुलाच्या रुंदीकरणाला सुरुवात
दिव्यातील रेल्वे प्रवाशांची गर्दीतून होणार सुटका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : दिवा रेल्वे स्थानकातील मुंबईच्या दिशेकडील पादचारी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून या पादचारी पुलाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या खांब उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत रुंदीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याने रेल्वे प्रवाशांची पुलावरील गर्दीतून सुटका होणार आहे. दिवा रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी लोकलने मुंबई, कर्जत, कसारा, पनवेल, वसई येथे आपल्या नियमित कामासाठी प्रवास करतात. दिवा रेल्वे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे; मात्र मुंबईच्या दिशेने असणारा आणि शहराच्या पूर्व भागाला जोडणारा पादचारी पूल अरुंद आहे. त्यामुळे प्रवाशांना कायमच गर्दीचा सामना करावा लागतो.
दिवा शहरातील बहुतांश लोकवस्ती शहराच्या पूर्व भागात आहे. मुख्य बाजारपेठही शहराच्या पूर्व भागातच आहे. यामुळे या स्थानकात सकाळी आणि सायंकाळी बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांची आणि प्रवाशांची मोठी गर्दी पुलावर पाहायला मिळते, तर चेंगराचेंगरी सदृश परिस्थितीही अनेकदा होते. याच पार्श्वभूमीवर येथील प्रवासी संघटनांकडून पुलाच्या रुंदीकरणाचे काम करण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासन, तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाशी बैठक घेत तसेच पत्रव्यवहार करून पुलाच्या रुंदीकरणाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे.
खांब उभारणीचे काम
सद्यःस्थितीत रुंदीकरणासाठी लागणाऱ्या खांब उभारणीचे काम सुरू आहे. येत्या काही आठवड्याच्या कालावधीत हे काम पूर्ण झाल्यानंतर गर्डर टाकण्याचे काम पूर्णत्वास येऊन रुंदीकरण होणार आहे.
दिवा रेल्वे स्थानकातील अरुंद पादचारी पुलामुळे मोठी गर्दी होते. यासाठी सातत्याने मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हे काम मार्गी लावले. या पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामुळे प्रवाशांची गर्दीतून लवकरच सुटका होणार आहे.
- आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.