आरटीओमध्ये बीएच सीरिजला चांगला प्रतिसाद
गत वर्षात ५७४ वाहनांची नोंद; पाच राज्यांमध्ये कार्यालय असणाऱ्यांना प्राधान्य
वाशी, ता. ७ (बातमीदार) ः नवी मुंबई आरटीओमध्ये बीएच सीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाच राज्यांमध्ये कार्यालय असणाऱ्यांना अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गत वर्षात ५७४ वाहनांची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत सरकारने मागील दोन वर्षांपासून वाहन नोंदणीसाठी ''बीएच सीरिज'' लॉन्च केली आहे. या सीरिजची नंबर प्लेट असलेली गाडी देशात कुठेही चालविता येते. त्यामुळे या बीएच सीरिजअंतर्गत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ५७४ वाहनांची नोंद करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून बीएच सीरिज वाहनांची नोंद वाढली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या नागरिकांचे पाच राज्यांमध्ये कार्यालय आहे, तसेच बॅंकिग क्षेत्र, केंद्र शासनामध्ये काम करणारे अधिकारी-कर्मचारी यांना या सीरिजचा लाभ होणार आहे. त्यामुळे या सीरिजची मागणी वाढत असल्याचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी स्पष्ट केले आहे. नवी मुंबईत आयटी, तसेच बॅंकिंग सेवा क्षेत्रातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या वाहनांची सीरिज घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
.....................
काय आहे ''बीएच सीरिज''
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ''बीएच सीरिज'' सुरू केली आहे. जेणेकरून नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याची इतर कोणत्याही राज्यात बदली झाल्यास, सध्या चालवत असलेले दुचाकी किंवा चारचाकी वाहन दुसऱ्या राज्यातदेखील तो नोंदणी न करता वापरू शकतो. पूर्वी दुसऱ्या राज्यात बदली झाल्यास त्यांना प्रथम त्यांचे वाहन रजिस्ट्रेशन असलेल्या राज्यातून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागत होते. मूळ राज्यातून एनओसी मिळाल्यानंतर, १२ महिन्यांच्या आत वाहनाचे नवीन राज्यात पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागत होते. याशिवाय वाहन खरेदीच्या वेळी १५ वर्षांसाठी भरलेला रोडटॅक्सदेखील वाहन मालकाला नवीन राज्यात ट्रान्स्फर करावा लागत होता, मात्र आता त्यापासून सुटका झाली आहे.
.................
''बीएच सीरिज'' रजिस्ट्रेशनसाठी अर्ज कोण करू शकतो
नवीन बीएच सीरिज नंबर प्लेट प्रत्येकासाठी आवश्यक नाही. ज्याची नोकरी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रान्स्फर झाली आहे. उदाः संरक्षण मंत्रालय, केंद्रीय विभाग, खासगी किंवा निमशासकीय कार्यालये, लष्कराचे कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या व्यतिरिक्त ज्यांची कार्यालये देशाच्या किमान चार प्रांतात आहेत, असे कर्मचारी त्यांच्या वाहनांची बीएच सीरिजमध्ये नोंदणी करून शकतात, मात्र बीएच सीरिजमध्ये वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.