शेतकऱ्यांची तहान भागवणारा वॉटरमॅन
राजीव डाके : सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. १८ : ठाणे, पालघर जिल्ह्यातील १० हजार लाख एकर जमिनीची तहान भागवण्याची किमया एका निवृत्त अभियंत्याने केली आहे. ठाण्यात राहणारा हा अभियंता २० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनीची तहान भागवण्यासाठी राबत आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकरी दुबार पीक घेऊ लागल्याने गाव-पाड्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. शेतकरी या अभियंत्याला वॉटरमॅन म्हणून ओळखू लागले आहेत. या वॉटरमॅनने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ५०० हून अधिक सिमेंट काँक्रीटचे चेक डॅम (छोटे बंधारे) बांधले आहेत.
ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यात सिव्हिल अभियंता म्हणून काम करत असलेले हेमंत जगताप यांनी रोटरीच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील नेहरूली गावात दगडाचा चेक डॅम (छोटा बंधारा) बांधून जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्याकामी सुरुवात केली. सध्या त्यांनी रोटरी आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ५०० हून अधिक चेक डॅम बांधले आहेत. एका बंधाऱ्याची २० ते ७० लक्ष लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. या पाण्यावर शेतकऱ्यांनी दुबार पीक घेण्याला सुरुवात केली आहे. गाव-पाड्यातील गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील मार्गी लागला आहे. २०१०-११ मध्ये जव्हार तालुक्यातील आक्रे ग्रामपंचायत परिसरातील गावांमध्ये नळातून पाणीपुरवठा योजनादेखील सुरू केली आहे. गुरेढोरे, महिलांना कपडे धुण्यासाठी जागा तयार करून दिली आहे. काही ठिकाणी गावात सार्वजनिक नळव्यवस्था निर्माण केली असल्याची माहिती ज्येष्ठ जलतज्ज्ञ हेमंत जगताप यांनी दिली.
शाळांसाठी जल पुनर्वलन योजना :
२५ शाळांसाठी जल पुनर्वलन योजना तयार करून देण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून, तीन ते चार ठिकाणी ही योजना पूर्ण होऊन ती यशस्वी झाली आहे.
बंधाऱ्यांच्या पाण्यावर भेंडी, काकडी, गवार, सिमला मिरची, वांगी, टोमॅटो, भोपळा, मिरची अशा पिकांसोबतच मोगऱ्याची पिके घेत आहोत. शेतकऱ्यांच्या दारांमध्ये गाय, बैल, बकऱ्या, कोंबड्या असे पाळीव पशू-पक्षीदेखील दिसू लागले आहेत.
- भारती शिंदे, लाभार्थी शेतकरी, फांगळोशी
मुरबाड, शहापूर भिवंडी, तालुक्यातील काही ठिकाणी या वर्षात ४५ बंधारे बांधण्याचे लक्ष असून, त्यातील २५ बंधारे अग्रक्रमाने बांधून दिले जाणार आहेत.
-हेमंत जगताप, जलतज्ज्ञ, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.