पेण, ता. १८ (वार्ताहर) : तालुक्याच्या पूर्व विभागापासून ते अंतोरे खाडीकिनाऱ्यापर्यंत वाहणाऱ्या भोगावती नदीतून पेण शहरासह तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होतो, मात्र अशुद्ध व गढूळ पाण्यामुळे अनेकांना काविळीची लागण झाल्याचे दिसून येते. याविरोधात सामाजिक संघटनांनी नगरपालिका प्रशासनावर अनेकदा मोर्चे, आंदोलने, उपोषणे केली आहेत, मात्र शहराला अजूनही शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
आजूबाजूला गावांतील कचरा, सांडपाणी सोडण्यात येत असल्याने भोगवतीचे नदीपात्र दूषित झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव जलपुरवठा योजना आणि शुद्धीकरण केंद्र सुरू राहणे आवश्यक आहे, परंतु सध्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था झाली असून, नगरपालिकेचे लक्ष नसल्याने शहरात होणारा पाणीपुरवठा गढूळ, अशुद्ध असल्याने आरोग्याच्या व्याधी बळावल्या आहेत.
काही दिवसांपासून शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असून, गढूळ पाण्यामुळे अनेक भागात काविळीची लागण झाल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते, मात्र पुढे कार्यवाही न झाल्याने नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा होत आहे.
पेण शहरातील सांडपाणी भोगवती नदीत सोडले जात आहे. तेच पाणी संपूर्ण शहराला पिण्याकरिता नगरपालिकेच्या माध्यमातून उचलले जाते. शहरात जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे. आठ-दहा दिवसांपासून शहरात काविळीची साथ वाढत आहे. गतवर्षी अशीच साथ तालुक्यातील ग्रामीण भागात आल्याने दोन-तीन जणांना जीव गमवावा लागला होता. ‘माझं पेण’ या संघटनेने दूषित पाण्याविरोधात वेळोवेळी आंदोलने केली आहेत.
राजू पाटील, समन्वयक, माझं पेण संघटना
पेणमध्ये काविळीच्या साथीचे नऊ रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यापैकी तीन रुग्ण ग्रामीण भागातील धावटे, हमरापूर, कळवा येथील आहेत. याशिवाय शहरातील आदर्श नगर, कन्या शाळा, विष्णुनगर, गोदावरीनगर, फणस डोंगरी, जगदंबा बिल्डिंग येथील रुग्णही उपचारासाठी येत आहेत. सहा रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. काविळीची साथ ही खराब पाणी, उघड्यावरील अन्नपदार्थ, चायनीज, थंडपेयामुळे पसरत असून, नागरिकांनी उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
- पांडुरंग गाडे, सहाय्यक अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय पेण
२०११ च्या जणगणनेनुसार, ३७ हजार ८११ लोकसंख्या होती २०२५ मध्ये अंदाजे ७५ ते ८० हजार लोकसंख्या झाली असून, सद्यःस्थितीत रोज किमान १८ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. शहरात एकूण दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत एक सहा एमएलडी, तर एक ५.५ एमएलडी आहे. यातील एक प्लांट अतिशय जुना आहे. दोन्ही प्लांट चालू आहेत. कालव्याला पाणी सोडल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे.
रमेश देशमुख, अधिकारी, पाणीपुरवठा पेण नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.