तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे काम नवी मुंबई शहरातील काही भागांत सुरू आहे. या कामाला कोपरखैरणे परिसरातील नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावू नयेत, यासाठी मनसेच्या वतीने सोमवारी (ता. १९) कोपरखैरणे सेक्टर १९ येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे.
नुकतेच करावे गाव आणि आसपासच्या परिसरामध्ये ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांचे जुने मीटर परस्पर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणीदेखील विरोध केला जात आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर परवडणे शक्य नाही; तरीदेखील या भागात हे मीटर का लावले जात आहेत, असा प्रश्न कोपरखैरणे परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. याबाबत मनसेचे चंद्रकांत डांगे यांनी नागरिकांना स्मार्ट मीटरबाबत सतर्क राहून विरोध करण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार वीजबिल भरण्यासाठी आठ ते दहा दिवस मुदत मिळते, ती व्यवस्था प्रीपेड मीटरमध्ये मिळणार नाही. रिचार्ज संपल्यास आपोआप वीजपुरवठा खंडित होईल. रिचार्ज करण्यासाठी पैसे नसणाऱ्यांना वीजपुरवठा होऊ शकणार नाही. त्यातून भविष्यात ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
-----------------
रोगापेक्षा इलाज भयंकर
वीजचोरी रोखण्याच्या उद्देशाने महावितरणने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याचा निर्णय घेतला; मात्र हा रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार असल्याची भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. याला नागरिक विरोध करीत असूनही खासगी कंपन्या स्मार्ट मीटर लावत आहेत. ही मनमानी आम्हाला मान्य नाही, असे मनसेचे चंद्रकांत डांगे यांनी सांगितले. मनमानीविरोधात महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन स्मार्ट मीटर प्रणालीला विरोध केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.