पाेईसर नाल्यावरील पुलावरून धोकादायक प्रवास
विद्यार्थी, ज्येष्ठांची कसरत
कांदिवली, ता. १६ (बातमीदार) ः कांदिवली पूर्वेला हनुमाननगर येथील वडारपाडा रोड क्रमांक दोन ते जेतवन बुद्ध विहार मार्ग जोडणारे पोयसर नदीवर (नाला) दोन लोखंडी पादचारी पूल आहेत. या पुलाची दयनीय अवस्था झाली असून, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
दोन्हीही लोखंडी पुलाचे पत्रे जीर्ण झाले असून, जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह, प्रवासी आणि स्थानिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पोयसर नाल्याच्या दुतर्फा दाटीवाटीची झोपडपट्टी आहे. दररोज शेकडो स्थानिक रहिवासी, प्रवासी आणि विद्यार्थी या नाल्यावरील पादचारी लोखंडी पुलाचा वापर करतात. यापैकी एक पूल हा पाल राजेंद्र हायस्कूल व दुसरा पूल शंकर महादेव मंदिराजवळ आहे. जवळपास १३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलामुळे विद्यार्थी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ आणि जलद झाला.
सध्या दोन्ही पूल गंजलेल्या व मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून, पुलाच्या लोखंडी तळाचे पत्रे जीर्ण होऊन छिद्रे पडली आहेत. हनुमाननगरमधील दोन शाळा, पाल शाळा, हनुमाननगर बाजारपेठ, शंकर मंदिर, हनुमाननगर ते क्रांतीनगर येथील रहिवासी या पुलाचा सर्वाधिक वापर करतात. त्यामुळे येथे नागरिकांची, विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ दिसून येते.
अपघाताची भीती
मोठ्या प्रमाणात वापर असलेल्या पुलावर अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. हनुमाननगरमधील नागरिकांनी अनेकदा या पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करून दुरुस्ती अथवा नवीन पुलांची उभारणी करावी, अशी मागणी पालिकेकडे केली आहे. भविष्यात दुर्घटना घडल्यास त्यास महापालिकेचे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश पावडे यांनी दिला आहे.
लोखंडी पुलाबाबत मी पालिकेकडे अनेकदा पत्रव्यवहार केला असून, सभागृहातदेखील मुद्दा लावून धरला होता. पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या नागरिकांना पुनर्वसनाठी घरे मिळावीत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- शंकर हुंडारे, माजी नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.