रोहा येथे छोटे सायंटिस्ट्स अभिनव उपक्रमास प्रतिसाद
रोहा, ता. १० (बातमीदार) ः शैक्षणिक उपक्रम संशोधिका व के. पी. आय. टी. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छोटे सायंटिस्ट्स हा विज्ञानाच्या संकल्पना व कौशल्ये स्पष्ट करणारा अभिनव उपक्रम रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच अन्य राज्यात व बाहेरील अन्य देशातही हा प्रकल्प राबविला जात आहे, तर रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड, माणगाव आणि सुधागड-पाली या पाच तालुक्यांमधील शाळांमध्ये छोटे सायंटिस्ट्स हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, रोहा तालुक्यातील एक्सेल कंपनीची संस्था श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व व्हिआरटीआय, अंशुल कंपनी यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमप्रसंगी एक्सेल कंपनीचे नंदकुमार पाटील, एक्सेल सामाजिक बांधिलकी विभागप्रमुख सुशील रुळेकर, अंशुल कंपनीचे एचआरप्रमुख किशोर तावडे, ज्ञान प्रबोधिनीचे ओंकार बाणाईत आदींनी विद्यार्थीवर्गाला मार्गदर्शन करून विजेत्या गटांना पारितोषिके दिले. तसेच स्पर्धेच्या निमित्ताने विविध शाळांमधील शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यामध्ये ओंकार बाणाईत यांनी चॅट जीपीटीचा वापर करून अध्यापनामध्ये अधिकाधिक उपयुक्त माहितीचा वापर कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोह्याचे सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.
.............
खारगाव येथे भवानी देवी उत्सव
रोहा (बातमीदार) ः तालुक्यातील खारगाव येथील जागृत देवस्थान श्री भवानी देवीमातेचा उत्सव व पालखी मिरवणूक सोहळा शनिवारी (ता. ८ ) पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून खारगाव येथील कोळीवाडा येथे अभिषेक व श्री भवानी देवीची आरती, महिलांसाठी हळदी-कुंकू, महाप्रसाद तसेच ह.भ.प. उदय बंद्री महाराज (खारगाव) यांचे कीर्तन त्याचप्रमाणे श्री भवानी देवीची भव्य पालखी सोहळा, मिरवणूक मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात पार पडली. यादरम्यान भजन (वारकरी संप्रदाय पंचक्रोशी, आरे बुद्रुक) व प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी ओंकार काटले प्रस्तुत मैफिल सप्तसुरांची हा मराठी ऑर्केस्ट्रा कार्यक्रमदेखील पार पडला. या कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्रची हास्य जत्रा फेम कलाकार व लेखक विनोद गायकर यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. या वेळी भिवंडीचा बुलंद आवाज गायिका करिष्मा पाटील, मुंबईची नृत्यांगना भक्ती लोखंडे त्याचबरोबर निवेदक म्हणून संतोष वाघमारे, गायिका सार्थी माळी, तर गायक म्हणून अमोल म्हात्रे, आलंकार पाटील आदी मंडळी यांच्या बहारदार कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सरमित्र प्रथमेश राक्षिकर (कोळी) व संपूर्ण टीमचे ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील जय भवानी ग्रामस्थ मंडळ, जय भवानी युवक मंडळ, जय भवानी महिला मंडळ, जय भवानी प्रसादिक भजन मंडळ व ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले.
............
पायलट ऋग्वेदचे खासदार सुनील तटकरेंकडून कौतुक
रोहे (बातमीदार) ः रोहे शहरातील अंधार आळीतील रहिवासी ऋग्वेद निंबाळकर (वय १९) याने प्लॉरिडा अमेरिका मेरिट आयलंड येथे व्यावसायिक पायलटचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. ऋग्वेद हा रोह्यातील पहिला तरुण पायलट ठरला असून, त्याचे खासदार सुनील तटकरे यांनी विशेष कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. रोह्यातील तरुणाने वैमानिक क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी ही बाब केवळ रोह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. या क्षेत्रात ऋग्वेद याने आणखी पुढे जात उज्ज्वल यश प्राप्त करावे, असा आशीर्वादरूपी शुभेच्छा खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या. रविवारी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार सुनील तटकरे हे रोह्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर, मयूर दिवेकर, महेश कोलटकर, समीर सकपाळ, शिल्पा धोत्रे, अहमद दर्जी, सुभाष राजे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष विलास गुजर, नुरुद्दीन रोहवाला, वसंत कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.