विक्रम गायकवाड
नवी मुंबई, ता. १६ : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवून खरेदी-विक्रीचे रॅकेट मोडीत काढण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने व स्थानिक पोलिसांनी २०२४ या वर्षांत ६६८ कारवाया करून तब्बल ३३ कोटी ६८ लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. तसेच अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या व त्याचे सेवन करणाऱ्या एकूण ९६२ आरोपींची धरपकड केली असून यात परदेशी नागरिकांची संख्या मोठी आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याने नवी मुंबई शहराची नशामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे दिसते.
नवी मुंबईत शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी व तरुणवर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तस्करी रोखण्यासाठी पुढाकार घेतला आणि अमली पदार्थमुक्त नवी मुंबई हे अभियान हाती घेतले. अभियानांतर्गत गुन्हे शाखेचे अपर आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे व स्थानिक पोलिसांनी शहरातील शाळा, महाविद्यालये, मॉल, रेल्वे स्थानक, बस स्थानक, उद्यान आदी ठिकाणी लक्ष ठेवून धाड टाकून अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणारे तसेच सेवन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली.
पोलिसांनी वर्षभरात ६६८ कारवाया करून तब्बल ३३ कोटी ६८ लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. तसेच ९६२ आरोपींची धरपकड केली असून यात ५६ विदेशी नागरिकांचा (आफ्रिकन नागरिक) समावेश आहे. विदेशी नागरिकांकडून तब्बल २५ कोटी ७० लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
परदेशी नागरिकांवरील कारवाई तीव्र
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत उलवे, खारघर, कोपरखैरणे, कामोठे व इतर भागात आफ्रिकन नागरिक बेकायदा राहत असल्याचे आणि त्यातील अनेक जण अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतल्याचे आढळले आहे. त्यामुळे आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार, परदेशी नागरिकांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबईत राहणाऱ्या परदेशी नागरिकांची नियमित झाडाझडती सुरू करण्यात आली आहे.
परदेशी नागरिकांची बायोमॅट्रिक्स नोंद
नवी मुंबई पोलिसांनी वर्षभरामध्ये विविध प्रकारच्या अनेक मोहिमा राबवल्या आहेत. मोहिमेदरम्यान एकूण ६५३ परदेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली असून सर्व परदेशी नागरिकांना त्यांच्या मूळ देशात हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार केलेले परदेशी नागरिक पुन्हा भारतात येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी त्यांची बायोमेट्रिक्स नोंद करण्यास तसेच त्यांची माहिती मुंबईतील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे (एफआरआरओ) पाठवण्यास सुरुवात केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला अनुसरून नवी मुंबईतही अभियानाला सुरुवात केली आहे. या नशामुक्त अभियानाचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर अभिनेते जॉन अब्राहम असून ते नशामुक्त नवी मुंबई अभियानाबाबत समाजमाध्यमांवर जगजागृती करीत आहेत. अभियानाच्या माध्यमातून समाजात अमली पदार्थांच्या नशेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. तसेच विद्यालये, विद्यापीठ कॅम्पस आणि शाळांना नशामुक्त करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण्यात येत आहे.
- मिलिंद भारंबे, आयुक्त, नवी मुंबई
वर्षभरातील कारवाई
एकूण कारवाया - ६६८
अमली पदार्थ जप्त - ३३ कोटी ६८ लाख रुपये
अटक आरोपी - ९६२
विदेशी नागरिक - ५६
विदेशी नागरिकांकडून जप्त अमली पदार्थ - २५ कोटी ७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.