विक्रमगड, ता. १६ (बातमीदार) : तालुक्यातील देहर्जे नदीवरील देहरजी मध्यम धरणाच्या खर्चात तब्बल एक हजार १५६ कोटींची वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन हजार ५९९.१५ कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. धरणाचे बांधकाम कोकण पाटबंधारे विकास महामंडळ करणार असून, त्यासाठी संपूर्ण अर्थसाह्य एमएमआरडीए करीत आहे.
देहरजी धरण प्रकल्प सुरुवातीला विक्रमगड आणि वाडा तालुक्याच्या सिंचनासाठी प्रस्तावित होता. १९७९मध्ये धरणासाठी ११.५२ कोटींची मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २००५मध्ये १५८.२५ कोटींना नव्याने मान्यता देण्यात आली, मात्र स्थानिकांचा विरोध, भूसंपादन आणि पुनर्वसनामधील अडचणींमुळे धरणाचे काम प्रत्यक्षात सुरू होऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात मुंबई महानगर क्षेत्रातील झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी भविष्यात लागणाऱ्या पाण्याचा विचार करून पालघर जिल्ह्यात नवीन धरणाची निर्मिती करण्याचा विचार पुढे आला.
वसई विरार महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी देहरजी धरण बांधण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. २०१८-१९ च्या दरसूचीवर आधारित एक हजार ४४३.७२ कोटींची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील जागेचे भूसंपादन, बाधित कुटुंबांचे पुनर्वसन, वितरण प्रणाली आणि इतर अनुषंगिक कामांच्या किमतीत वाढ झाल्याने धरणाच्या एकूण खर्चात एक हजार १५५.४३ कोटींची वाढ झाल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
चार वर्षांत खर्चात वाढ
२०२१मध्ये एक हजार ४४३.७२ कोटींची प्रशासकीय मान्यता या धरणाच्या खर्चास देण्यात आली होती, मात्र भूसंपादन, पुनर्वसन आणि धरणाच्या इतर अनुषंगिक कामांचे दर वाढल्याने धरणाच्या एकूण खर्चात वाढ झाल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
२७२ कुटुंबे बाधित होणार
देहरजी धरणासाठी विक्रमगड तालुक्यातील साखरे, खुडेद आणि जांभा या गावांतील २३८ हेक्टर खासगी तसेच ४४५ हेक्टर वनजमीन अशी एकूण ६८३ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जाणार असून, जवळपास २७२ कुटुंबे बाधित होणार आहेत. या कुटुंबांचे वाडा तालुक्यातील खरीवली (कोहोज) येथे पूनर्वसन होणार असून, त्यासाठी २९.८६ हेक्टर खासगी जागेचे संपादन करण्यात आले आहे. मार्चपर्यंत भूसंपादनाचे निवाडे जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. धरणाच्या खालील आणि वरच्या बाजूला प्रत्येकी तीन कोकण पद्धतीचे बंधारे प्रस्तावित आहेत.
४० लाख लोकांना पाणी
साखरे आणि खुडेद गावाजवळ असलेला देहरजी धरण प्रकल्प हा पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून राबवण्यात येत आहे. एकूण ९५.६० दलघमी पाणी क्षमतेच्या धरणातून वसई विरार महापालिका क्षेत्रासाठी ६९.४२ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित असणार आहे. याशिवाय एमएमआरडीएच्या इतर क्षेत्रालादेखील पाणी उपलब्ध केले जाणार आहे. यामुळे सुमारे ४० लाख लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. धरणाचे बांधकाम तीन वर्षांपासून सुरू असून, शिल्लक काम पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन ठेवण्यात आले आहे.
देहरजी धरण प्रकल्पाची वैशिष्ट्ये
धरणाची एकूण पाणी क्षमता : ९५.६० दलघमी
लांबी : ६१.७५ मीटर, उंची : ७१.६० मीटर
विद्युतनिर्मिती : पाच मेगावॉट
धरणाचे खोदकाम : १०० टक्के पूर्ण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.