कासा, ता. १६ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथील उड्डाणपुलाखाली मालवाहू कंटेनर अडकून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. या घटनेमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. स्वयंसेवकांनी मदतीसाठी धाव घेत कंटेनरच्या टायरमधील हवा कमी करून वाहन बाहेर काढले, मात्र वारंवार अशा घटना घडत असल्याने चालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
चारोटी उड्डाणपुलाखाली मोठी वाहने अडकण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, कारण या उड्डाणपुलाची उंची कमी आहे. काही वर्षांपूर्वी स्थानिक नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुलाच्या तोंडावर लोखंडी पाइप लावले होते, मात्र एका कंटेनरने ते तोडून टाकले. त्यानंतर दिशादर्शक फलक लावण्यात आले होते, पण आता ते दिसत नाहीत.
डहाणू बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरच्या चालकाला योग्य मार्गाची माहिती नसल्याने त्याने चुकीचा रस्ता निवडला होता. परिणामी कंटेनर उड्डाणपुलाखाली अडकला. या गोंधळात कासा मार्गे डहाणूकडे जाणाऱ्या एका रिक्षाला अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली, पण वाहतूक तासभर ठप्प झाली होती. वाहन सुरक्षेसाठी स्वयंसेवक कार्यरत असले, तरी वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका आहे. महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुलाखाली उंची मर्यादेचे स्पष्ट दिशादर्शक फलक लावावेत, तसेच सिग्नल यंत्रणा बसवावी, अशी मागणी प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात अन्यथा मोठा अपघात घडू शकतो, अशी वाहनचालकांची भावना आहे.
चारोटी पुलाखाली मोठी वाहने अडकण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना त्रास होतो. वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते आणि अपघाताचा धोका वाढतो. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
- राजकुमार गिरी, वाहनचालक
चारोटी उड्डाणपुलाखाली होणाऱ्या अपघातांसाठी सिग्नल व्यवस्था आणि सूचनाफलक लावले जातील. पुढील काळात पुलाखालील भागाची उंची कमी करण्याचाही प्रयत्न केला जाईल. सध्या तेथे स्वयंसेवक तैनात असून, त्यांना अधिक दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- सुहास चिटणीस, व्यवस्थापक, महामार्ग प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.