माणगावमध्ये तृणधान्य आधारित पाककला स्पर्धा उत्साहात
माणगाव, ता. १८ (वार्ताहर) : सन २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याचे औचित्य साधून कांचनगंगा शिक्षण संस्था संचालित आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, उतेखोल (माणगाव) या शाळेतर्फे तृणधान्य आधारित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, मका, ओट्स, वरी, राळे, नाचणी यापैकी कोणतेही पदार्थ वापरून पाककृती तयार करणे हा स्पर्धेचा मूळ विषय होता.
या स्पर्धेत शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी भाग घेतला. पिझ्झा, बर्गर तसेच पावाचा वापर टाळून भारतीय पारंपरिक पद्धतीने आपली पाककला वापरून पौष्टिक जेवण बनवणे हे या स्पर्धेचे मूळ उद्दिष्ट होते.
शाळेच्या पटांगणामध्ये झालेल्या या पाक स्पर्धेमध्ये साक्षी वाघरे प्रथम, निधी उभारे द्वितीय तर प्रसिका जंगम हिचा तृतीय क्रमांक आला. त्यांना उत्तम प्रकारे वस्तूरूपाने बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या परीक्षेसाठी सर्व बक्षिसांचे आयोजन दक्षिण रायगड युवा अध्यक्ष भाजप नीलेश थोरे यांच्या सौजन्याने करण्यात आले. या स्पर्धेचे मूल्यमापन पाककलेमध्ये पारंगत प्रतिभा पोळेकर, रश्मी अंबुर्ले व नीलम वनारसे या शिक्षिकांनी केले.
यशस्वी गृहिणी होण्यासाठी पाककलेत पारंगत होणे महत्त्वाचे असते. कारण ज्या गृहिणीस आपल्या पाककौशल्याने घरातील सर्व माणसांना मंत्रमुग्ध करता येते ती गृहिणी घर आणि संसार यशस्वीरीत्या चालवू शकते, असे मत कांचनगंगा शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक अमोल जंगम यांनी व्यक्त केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि फास्ट फूडच्या जगात आपली परंपरागत भारतीय पाककला लोप पावत चालली आहे. पौष्टिकपेक्षा आजकालचे तरुण चवीला जास्त महत्त्व देत असल्याचे दिसते. तसेच आजीच्या हाताची चव व गोडवा पुढच्या पिढीला मिळणे गरजेचे वाटते, म्हणून या पाककला स्पर्धेचे आयोजन केल्याचे अमोल जंगम यांनी सांगितले.
अशा अनोख्या व आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करून यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल शिक्षक तसेच पालकवर्गातून कांचनगंगा शिक्षण संस्थेचे संस्थापक व संचालक जंगम गुरुजी यांचे जनमानसातून अभिनंदन केले जात आहे.
फोटो ओळ - आदर्श प्राथमिक विद्यामंदिर माणगाव येथे पाककलेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.