रिक्षाचालकांची मनमानी प्रवाशांसाठी ठरतेय मनस्ताप
जवळील भाड्यासाठीही आकरतात अधिकची रक्कम
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : शहारातील रिक्षाचालकांच्या मनमानीचा फटका प्रवाशांना वारंवार बसत असतो. कधी भाडे नाकारणे, तर कधी मीटर न टाकता सरसकट भाडे आकारणे, अशी प्रकरणे नेहमीच घडत असतात. याशिवाय मीटरही न पडणाऱ्या, जवळच्या भाड्यासाठी रिक्षाचालकांनी ४० ते ६० रुपयांचा दर ठरवलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप बसविण्यासाठी उपप्रादेशिक वाहतूक विभागाकडून वारंवार कारवाईचा बडगा उगारला जातो. तसेच दंडही वसूल केला जातो, मात्र कारवाईनंतर पुन्हा रिक्षाचालक मनमानी करण्यास सुसाट होतात. खासकरून शहारातील रेल्व स्थानकाबाहेर असणाऱ्या रिक्षाचालकांची मुजोरी प्रवाशांना डोकेदुखी झाली आहे. त्यात नवी मुंबईतील सध्याची लोकसंख्या ही १८ लाखांच्या घरात आहे, तर कामानिमित्ताने शहरात येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या सरासरी आठ ते दहा हजार आहे. शहरातील रिक्षांची संख्या २० हजारांच्या आसपास आहे. त्यात सरकारने परमिट खुले केल्याने मागील काही वर्षांपासून रिक्षांची संख्या अफाट वाढली आहे. शहरात एनएमएमटी तसेच रेल्वेसेवेसह खासगी वाहतूक असली तरी, सर्रासपणे रिक्षाचाच वापर केला जातो. अंतर्गत भागात बस जाऊ शकत नसल्याने नागरिकांना रिक्षाचाच आधार घ्यावा लागतो.
रिक्षाचालकांची मुजोरी
रिक्षाचालकांकडून मीटरने भाडे आकारण्यापेक्षा, थेट भाड्याचीच मागणी केली जाते. ज्या ठिकाणी रिक्षाचे भाडे २३ रुपयांच्या पुढे होत नाही, त्या ठिकाणी जाण्यासाठीही ४० ते ६० रुपये आकारले जातात, तर ज्या ठिकाणी मीटरनुसार ६० रुपये भाडे होते, अशा ठिकाणी थेट १०० रुपये भाडे आकारले जाते. नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे, घणसोली, वाशी, नेरूळ इत्यादी ठिकाणी रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो. रिक्षाचालकांच्या मनमानी आणि आडमुठेपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकावर असलेल्या किंवा रिक्षाशिवाय इतर पर्याय उपलब्ध नसलेल्या विभागात रिक्षाचालक हे प्रवाशांचा फायदा घेऊन मनमानीपणे भाडे आकारतात, तर कधी भाडे नाकारले जाते, तर काही भागात मीटर डाऊन न करता मनमानी भाडे आकारणी केली जाते.
जास्तीच्या भाड्याची मागणी
दिघा रेल्वे स्थानक ते बेलापूर रेल्वे स्थानक या परिसरातील भाग रेल्वेमुळे पूर्व पश्चिम, असा विभागला गेला आहे. त्यामुळे पूर्वेतून पश्चिमेकडे जाण्यासाठी रिक्षाचालकांकडून नकारच दिला जातो. काही रिक्षाचालक प्रवाशांना घेऊन जायला तयार होतात, मात्र त्यासाठी मनमानी पद्धतीने भाड्याची मागणी करतात. ज्या प्रवासासाठी मीटरने ३० रुपयांपेक्षा जास्त भाडे होत नाही, तिथे थेट ६० ते ८० रुपयांची मागणी केली जाते.
पूर्वी रिक्षाचालकांबाबतच्या तक्रारी करण्यासाठी, प्रत्येक रिक्षाच्या मागे संपर्क क्रमांक लिहिलेला असायचा. तसेच तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक आहे, मात्र तो क्रमांक कोणता आहे, हेच बहुतांश प्रवाशांना माहीत नसल्याने रिक्षाबाबतची तक्रार कुठे करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.