श्रीवर्धन माणगाव प्रवास त्रासदायक
लोकल फेरीसाठी लालपरीऐवजी शिवशाही; गाडीतील वातानुकूलित यंत्रणा बंद
श्रीवर्धन, ता. १८ (वार्ताहर) : श्रीवर्धन आगाराकडून सकाळी सव्वासात व दुपारी एक वाजता श्रीवर्धन ते माणगाव या मार्गावर साधी गाडी न सोडता वातानुकूलित शिवशाही गाडी सोडण्यात येत असल्याने अवास्तव तिकीटदरामुळे प्रवासीवर्गासाठी शिवशाही गाडीमधून प्रवास करणे गरमागरम ठरत आहे. गाडीतील अनेक आसनावरील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने शिवशाही गाडीचा प्रवास त्रासदायक ठरत आहे. आगाराकडे लालपरी उपलब्ध असतानाही शिवशाहीचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न प्रवासीवर्गाला पडत आहे.
प्रवाशांच्या खिशाला कात्री
श्रीवर्धन बस स्थानकातून सकाळी सव्वासात वाजता माणगावकडे जाणारी व सव्वादहा वाजता माणगाव येथून श्रीवर्धनला येणारी तसेच दुपारी एक वाजता श्रीवर्धन येथून माणगाव येथे गेलेली गाडी दुपारी तीन वाजता श्रीवर्धनकडे मार्गस्थ होते. श्रीवर्धन आगाराची या वेळापत्रकानुसार मार्गस्थ होणारी सदरची गाडी लालपरी होती. सध्या अनेकदा साध्या गाडीऐवजी डिलक्स बस, तर गेल्या तीन ते चार दिवस या मार्गावर शिवशाही गाडी सोडण्यात येत आहे. लोकल गाडीही लालपरीऐवजी शिवशाही सोडण्यात येते, याचा फटका प्रवासीवर्गाला सहन करावा लागतोय. श्रीवर्धन-माणगाव या मार्गावर साध्या गाडीचे तिकीट ८१ रुपये इतके आहे तर, शिवशाहीचे तिकीट १२० रुपये आहे. शिवशाही गाडीत ज्येष्ठ नागरिक व महिलांना तिकीटदरात सवलत मिळते, परंतु या सवलतीचा आम्हाला फायदा काय, असे ज्येष्ठ नागरिक व महिलांकडून विचारले जाते.
साध्या गाडीची मागणी
श्रीवर्धन आगाराकडून या मार्गावर देण्यात आलेल्या शिवशाही गाडीची दुरवस्था झाली आहे. अनेक आसनांवरील वातानुकूलित यंत्रणा बंद अवस्थेत आहे, तर काचांवरील पडदेही व्यवस्थित नाहीत. काचांमधून गाडीत येणारे ऊन व बंद अवस्थेतील अनेक आसनांवरील वातानुकूलित यंत्रणा यामुळे प्रवासीवर्गाचा श्रीवर्धन माणगाव हा प्रवास त्रासदायक ठरत आहे. सदरच्या शिवशाही गाडीत बेल किंवा बझर नसल्याने गाडीच्या शेवटच्या आसनावर बसलेला प्रवासी आपल्या थांब्यावर उतरण्यासाठी दाराजवळ येईपर्यंत गाडी मैलभर पुढे गेलेली असते. लवकरात लवकर शिवशाही गाडीऐवजी साधी गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासीवर्गाने केली आहे.
==================================================
प्रतिक्रिया:-
श्रीवर्धन आगारातील गाड्या सीएनजी किट बसवण्यासाठी कंपनीत पाठवल्या आहेत. या कारणाने आगारात गाड्यांचा तुटवडा आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी इतर आगारातील गाड्या मागविण्यात आल्या आहेत. सीएनजी गाड्या श्रीवर्धन आगारात आल्या की सेवा पूर्ववत होईल.
:- महिबूब मणेर, श्रीवर्धन आगारप्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.