गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलचा जीसीएस तरंग प्रतिसाद
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) ः यशोदा एज्युकेशन ट्रस्ट संचलित गुरुकूल कॉन्व्हेंट स्कूलचा जीसीएस तरंग वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच पार पडला. हा वार्षिक सोहळा कोपरखैरणे येथील कै. शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मैदान सेक्टर १५ ते १८ येथे साजरा झाला. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी खासदार संजीव नाईक, प्राना फाउंडेशनचे अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, सुभाष चव्हाण, भीमराव असवले, माजी नगरसेविका भारती पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, समाजसेवक ज्योतिराम भालेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वतीसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या अध्यक्षा कविता जाईगडे यांनी प्रस्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे माजी खासदार संजीव नाईक व डॉ. प्राची पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदक रणजीत मोरे व नृत्यशिक्षक सुरज बिरंबळे व तसेच विविध शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्याविष्कार सादर करून उपस्थित मान्यवरांचे व पालकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली.
............
नेरूळमध्ये क्रिकेट स्पर्धा उत्साहात
तुर्भे (बातमीदार) ः अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग २०२५ डे-नाईट क्रिकेट स्पर्धा नेरूळमधील एमजीएम मैदानात पार पडल्या. या क्रिकेट स्पर्धेत आयांश इलेव्हन विजेता, तर अभंग इलेव्हन संघ उपविजेता ठरला. नवी मुंबई पालिकेतील स्थानिक माजी नगरसेविका सुनीता मांडवे यांनी सलग दोनदिवसीय खेळवण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. या क्रिकेट स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत विजेत्या आयांश इलेव्हन संघास २० हजार रोख, चषक आणि सन्मानचिन्ह, तर उपविजेत्या अभंग इलेव्हन संघास १२ हजार रोख रक्कम, आकर्षक चषक आणि सन्मानचिन्ह माजी नगरसेवक रतन मांडवे, बेलापूर विधानसभा युवा अध्यक्ष निखिल मांडवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ दी सीरिज गणेश कदम ठरला. उत्कृष्ट गोलंदाज अक्षय कांबळे, उत्कृष्ट फलंदाज अजित धनावडे, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शुभम पार्टे ठरला.
..................
शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी
नेरूळ (बातमीदार) ः सीवूड्स येथील पोदार इंटरनॅशनल शाळेमध्ये एका नववीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनावर सुरक्षेच्या बाबतीत बोट ठेवण्यात येत आहे. याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नवी मुंबई महापालिका शाळा व्यवस्थापनाकडे सुरक्षा संबंधित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या विषयासंदर्भात शिवसेना उबाठा पक्षाच्या शिष्टमंडळाने शिक्षण विभागाचे उपायुक्त यांची भेट घेऊन खालील मागण्या मांडल्या आहेत. याप्रसंगी उपशहरप्रमुख ॲड. कौस्तुभ मोरे, उपविभागप्रमुख सिद्धार्थ गायकवाड, उपशाखाप्रमुख मयूर जंगम, गणेश खंडागळे उपस्थित होते. शाळा व्यवस्थापनांचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत असलेल्या निष्काळजीपणाबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. नवी मुंबईमध्ये असंख्य खासगी शाळा आहेत. या सर्व शाळा वार्षिक शुल्काच्या नावाखाली अक्षरशः लाख रुपये घेत असतात, मात्र दुर्दैवाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे. या अगोदरही शाळेतूनच अपहरण आणि इतर घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या इमारतींचा सर्व परिसर ग्रीलने झाकण्यात यावा. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कौन्सिलिंग ऐच्छिक नसून अभ्यासक्रमातच अंतर्भूत असावे. शालेय परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. अगोदरच लावलेले असतील, तर ते वापरात आहेत की नाहीत हे नियमित तपासून घेणे, आदी नियम काटेकोरपणे अमलात आणण्याची मागणी यावे ळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात करण्यात आली.
................
सीवूड्समध्ये दोनदिवसीय महिला मेळावा
नेरुळ (बातमीदार) ः जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त सीवूड्स सेक्टर ४८ येथील गणेश मैदान येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ८ व ९ मार्च असे दोन दिवस समता महिला मंडळातर्फे आयोजित केलेल्या या मेळाव्यात विविध वस्तूंची रेलचेल असणार आहे. यात कला, खाद्य संस्कृती, उद्योग, आरोग्य अशा अनेक विषयांवर प्रदर्शनात स्टॉल असणार आहे. विविध घरगुती वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांना दुकान उभारून वस्तूंची विक्री करता येत नाही, अशा महिलांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यातून त्यांच्या घरगुती व्यवसायाला चालना मिळणार आहे. तसेच महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम असणार असून, यात मेहंदी, रांगोळी, नृत्य व गायन, पाककला स्पर्धा, होम मिनिस्टर व पारंपरिक खेळ, संगीत खुर्ची, निबंध, चित्रकला स्पर्धा असणार आहे. यात महिलांना आपल्या कलागुणांना वाव देता येणार आहे. त्यासह महिलांच्या रोजगाराच्या दृष्टीने उपक्रम राबवत आरोग्य शिबिर घेण्यात येणार असून त्यात महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
.......................
दहावीच्या परीक्षेला खारघरमध्ये ४६० विद्यार्थी
खारघर (बातमीदार) : २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी खारघरमधून ४६० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. खारघरमधील गोखले स्कूल आणि कोपरा गावातील सुधागड या दोन केंद्राची निवड करण्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहे. खारघर परिसरात १० माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने खारघर सेक्टर १२ मधील गोखले स्कूल आणि कोपरागाव येथील सुधागड या दोन शाळेत केंद्र उपलब्ध करून दिले आहेत. दोन्ही केंद्र शांत ठिकाणी असल्यामुळे पालक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहेत.
.............
शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
वाशी (वार्ताहर) : शिवजन्मोत्सव सोहळा समिती, नवी मुंबई यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत नेरूळ पश्चिम येथील तेरणा डेन्टल ऑडिटोरिअम, प्लॉट क्रमांक १२ येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजन्मोत्सव सोहळा समिती, नवी मुंबईतर्फे मागील सहा वर्षांपासून शिवजन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवविले जातात. यंदाही परंपरा कायम असून रक्तदान शिबिरासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम जसे की, शाहिरी कार्यक्रम, शिव व्याख्यान, युवकांना मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, रॅली इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांना अभिप्रेत सामाजिक ऐक्याची शिवजयंती साजरी करण्यासाठी समिती कार्यरत असून या रक्तदान शिबिराला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.