भांडुपमध्ये रेल्वे पूल धोकादायक
गुळगुळीत लाद्यांवर प्रवासी घसरण्याच्या घटना; उपायोजनांची गरज
मुलुंड, ता. २४ (बातमीदार) ः भांडुप पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे पुलाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या पुलावर लावलेल्या लाद्या अत्यंत गुळगुळीत असल्याने प्रवाशांना जपून चालावे लागते. परंतु, रेल्वे पकडण्यासाठी गडबडीत असलेले प्रवासी अनेकदा घाईघाईने चालत असतात किंवा धावत असतात. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सध्या अनेकदा प्रवासी या लाद्यांवरून घसरत आहेत.
पायऱ्यांवर लावलेल्या लाद्यांचे कटिंग योग्य पद्धतीने केलेले नाही. त्यामुळे चढताना किंवा उतरताना अपघात होण्याचा धोका आहे. ईशान्य मुंबईचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील हे गेल्या काही दिवसांपासून गोवंडी, घाटकोपर आणि मुलुंड रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाची पाहणी करीत आहेत. या वेळी त्यांचे लक्ष या पुलावरील गुळगुळीत लाद्यांकडे गेले असता त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
पावसाळ्यात या लाद्यांमुळे प्रवाशांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर भांडुप रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवर अनेक ठिकाणी कचरा टाकण्यात आलेला आहे. या ठिकाणी उघडी पडलेली वायरिंग धोकादाय ठरू शकते. येथील लाद्यांची समस्या आम्ही वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊ, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
मुलुंड, भांडुप, कांजूर मार्ग, घाटकोपर, गोवंडी या स्थानकांवर एस्केलेटर, पंखे आणि इतर सुविधांची कमतरता असल्याची तक्रार केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली होती. त्यानंतर नूतनीकरण कार्याची सुरुवात झाली, मात्र हे काम अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. रेल्वे प्रशासनाला या ठिकाणी लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.
- संजय दिना पाटील
खासदार, ईशान्य मुंबई
भांडूप पूर्व-पश्चिमला जोडणारा पूल प्रवाशांसाठी उपयुक्त असला तरी या पुलावर बसवलेल्या गुळगुळीत लाद्यांमुळे येथून चालताना विशेष काळजी घ्यावी लागते. चाकरमानी लोकल पकडण्यासाठी घाईघाईत वेगाने चालतात. परिणामी या ठिकाणी घसरून शारीरिक इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- विवेक सावंत, सामाजिक कार्यकर्ते
भांडूपमधील स्कायवॉकवर अनेक ठिकाणी कचरा टाकला आहे. हा कचरा पालिकेने उचलून स्वच्छ करावा, अशी आमची मागणी आहे.
- तृप्ती सावंत, भांडूप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.